पुणे | उत्तर प्रदेशातील तस्करांकडून गुटख्याचे रॅकेट

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नर्हे परिसरातील खाडेवाडी येथील एका गोडाऊनवर छापा टाकून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल १ कोटी ३९ लाखांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. यामध्ये काही कच्चा मालदेखील मिळाला आहे. यामुळे आरोपी येथे गुटखा तयार करत असल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पुष्पेंद्र अकबाल सिंग (२७), सुनील पथ्थन सिंग (४५), चंदन अजयपाल सिंग (३२, सर्व रा. नर्हे, मूळ. रा. उत्तरप्रदेश), मुकेश कालुराम गेहलोत (२८, रा. आंबेगाव, मूळ. रा, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, आरोपींचा साथीदार नीलेश ललवानी (४०, रा, नर्हे) याच्यावर गुन्हा दाखल असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी ४२ पोलीस अंमलदाराने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात गुटखा विकण्यास बंदी आहे. पण, तरीहीराज्यभरात हे तस्कर सक्रीय आहेत. पुणे शहरातही गुटखा विक्रेत्यांचे मोठे जाळे असल्याचे पोलिसांनी यापूर्वी वेऴोवेळी केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शनिवारी रात्री नर्हे भागातील खाडेवाडी येथे एका गोडाऊनमध्ये गुटख्याचा साठा असून येथून शहर परिसरात गुटखा वितरीत होत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.
त्यानुसार यूनिट दोन, सामाजिक सुरक्षा विभागासह व इतर पथकांनी तेथे छापा टाकला. त्यावेळी येथे गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी येथून एका विशिष्ट प्रकारच्या गुटख्याचा ९८ लाख ८८ हजार रुपयांचा २०७ पोती, आणि ५ लाख ७६ हजारांचा दुसऱ्या प्रकारच्या गुटख्याची २० पोती जप्त केली. तसेच पोलिसांना काही कच्चा माल मिळालेला असून पोलिसांनी एकूण एक कोटी ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाकडून रविवारी देखील याप्रकरणी कारवाई सुरू होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.





