Gutka Raid : टाकळी हाजीमध्ये ‘गुटखा किंग’वर छापा! अन्न व औषध प्रशासनाची शिरूर पोलिसांसोबत संयुक्त कारवाई
Gutka Raid : अन्न सुरक्षा अधिकारी आणि शिरूर पोलिसांची संयुक्त कारवाई; टाकळी हाजी येथील गोदामावर दुपारी दोन वाजता टाकला छापा.

Gutka Raid – महाराष्ट्र राज्यात गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूवर बंदी असतानाही टाकळी हाजी परिसरात बेकायदेशीर साठा करून विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर शिरूर पोलिसांनी कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी १ लाख ११ हजार १६२ रुपये किमतीचा विविध नामांकित कंपन्यांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, टाकळी हाजी येथील संदीप भानुदास घोडे (वय ४०) हा बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू व पानमसाल्याचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सोमनाथ सावळे यांच्या फिर्यादीवरून पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने २५ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता टाकळी हाजी येथे छापा टाकला.
या कारवाईत रजनीगंधा, विमल, आरएमडी, रॉयल आणि हिरा यांसारख्या विविध ब्रँड्सचे बॉक्स आढळले. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत दोन वेगवेगळ्या पंचनाम्यांनुसार अनुक्रमे ४१,३०१ रुपये आणि ६९,८६१ रुपये इतकी आहे. महाराष्ट्र शासनाने या पदार्थांच्या साठवणूक व विक्रीवर बंदी घातलेली असतानाही हा साठा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खटिंग करत असून, या कारवाईमुळे परिसरातील अवैध गुटखा विक्रीला मोठा चाप बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





