Gujarat Assembly Elections 2022 : गुजरातमध्ये ओवेसींमुळे कॉंग्रेसचे नुकसान

अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी संपूर्ण देशाचे या राज्याकडे लक्ष लागले आहे. राज्यात सगळ्याच प्रमुख पक्षांनी आपली शक्ती पणाला लावली असली तरी भारतीय जनता पार्टी, कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.
अशातच असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्षही रिंगणात उतरला असल्यामुळे त्याची चाचपणी काही जनमत चाचण्यातून केली गेली आहे. छोट्या छोट्या मुद्द्यावरून जनमत चाचण्या घेतल्या जात आहेत व त्याचा कौल जाहीर केला जातो आहे.
ओवेसी रिंगणात उतरल्यामुळे कोणाला जास्त फटका बसणार असा सवाल मतदारांना विचारण्यात आला होता. तेव्हा सर्वाधिक मतदारांनी कॉंग्रेसला बसेल असे उत्तर दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार ओवेंसीचा कॉंग्रेसला 50 टक्के, भाजपला 30 टक्के तर आपला 18 टक्के फटका बसण्याची शक्यता आहे.
#T20WorldCup #AFGvSL | अफगाणिस्तान सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर
दरम्यान, या चाचणीच्या निष्कर्षाबाबत बोलताना कॉंग्रेसचे नेते अखिलेश सिंह यांनी खिल्ली उडवली आहे. काहीही फुटकळ विषयांवर चाचण्या घेतल्या जात आहेत. लोकांना ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत त्याच प्रकारची उत्तरे त्यांच्याकडून येतील. मात्र, काहीही असले तरी राज्यात कॉंग्रेसचेच सरकार येणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच ओवेसी आणि अरविंद केजरीवाल यांचा आप या भाजपच्या बी-टीम आहेत याची सगळ्यांना कल्पना असल्याचा दावाही त्यांनी केला.





