Solapur politics : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पहिल्या टप्प्यात नगपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. १० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या दरम्यान निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे.२ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबर या दिवशी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांची घोषणा होताच वेगवान हालचाली घडत आहेत. महाविकास आणि महायुती या दोन्हींसाठी या निवडणुका महत्वाच्या असणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातही निवडणकीचे राजकीय रंग भरण्यास सुरूवात झालेली आहे. ही स्थानिक निवडणूक पालकमंत्री विरुद्ध खासदार अशी होणार आहे. याचे कारण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातून माण खटाव या विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा विजयी झालेले सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमने सामणे येणार आहेत. कोणाची किती ताकद ? जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर नजर टाकल्यास सोलापूर जिल्ह्यात सहा आमदार महाविकास आघाडीचे आहेत. माळशिरस, माढा, करमाळा, मोहोळ या चार मतदारसंघात शरद पवारांचे आमदार असून सांगोल्यात शेतकरी कामगार पक्ष आणि बार्शीत उबाठा गटाचा आमदार आहे. जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक होणार आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. अकलूज, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, करमाळा, कुर्डूवाडी आणि मोहोळ या 6 नगरपालिका जिंकण्यासाठी बांधणीने वेग घेतला आहे. आमदार अभिजीत पाटील, आमदार नारायण पाटील, आमदार उत्तमराव जानकर, आमदार राजीव खरे या शरद पवार गटाच्या आमदारांसोबत शेकाप आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि उबाठा गटाचे आमदार दिलीप सोपल हेही आपली ताकद घेऊन महाविकास आघाडीसाठी मैदानात उतरले आहेत. पालकमंत्र्याची प्रतिष्ठा पणाला महायुतीसाठी येथील राजकीय परिस्थित फारशी चांगली नसल्याचे चित्र आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे असून त्यांच्याकडून भाजपची ताकद वाढविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. येथील काही माजी आमदार भाजपमध्ये सामील होण्यासाठी इच्छुक आहेत. ही निवडणूक पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांची प्रतिष्ठा पणाला लावणारी असणार आहे. यामुळे पुढची राजकीय समीकरणे कशी जुळणार? काय होणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा: Aamir Khan: आमिर खानच्या आईमुळे झाली साक्षी तंवरची ‘दंगल’मध्ये एन्ट्री; मिस्टर परफेक्शनिस्टने सांगितला रंजक किस्सा