Pratik Shinde : रील स्टार प्रतीक शिंदेच्या फॉर्च्युनरचा भीषण अपघात, पुणे-सोलापूर महामार्गावर घडली दुर्घटना

पुणे (इंदापूर) : सोशल मीडियावर रील्समुळे प्रसिद्ध असलेल्या प्रतीक शिंदेच्या नव्या टोयोटा फॉर्च्युनरने भरधाव वेगात ह्युंदाई क्रेटाला पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या धडकेत तिन्ही वाहनांचे लाखोंचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावर गुरुवारी (११ सप्टेंबर) सायंकाळी ५ वाजता मदनवाडी (सकुंडे वस्ती) येथे घडला आहे.
भिगवण पोलिसांनी फॉर्च्युनर चालक प्रतीक राम शिंदे (वय २४, रा. भादलवाडी, ता. इंदापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताने ‘फिल्मी स्टाईल ड्रायव्हिंग’वर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, स्थानिकांमध्ये संतापाची लाट आहे.
नेमकं काय घडलं?
निखील बाळासाहेब होले (रा. अकलूज, सोलापूर) आपली ह्युंदाई क्रेटा घेऊन महामार्गावरून प्रवास करत होते. यावेळी प्रतीक शिंदेची काळी टोयोटा फॉर्च्युनर भरधाव वेगाने पाठीमागून आली आणि क्रेटाच्या बाजूला जोरदार धडकली. या धडकेचा जोर इतका होता की, क्रेटा पुढे असलेल्या मारुती व्हॅगन आरवर जाऊन आदळली.
यामुळे तिन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. फॉर्च्युनरचा पुढचा भाग तुटला, क्रेटाचा मागचा भाग खराब झाला, तर व्हॅगन आरच्या पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली. स्थानिकांनी आणि पोलिसांनी तातडीने धाव घेऊन वाहने बाजूला केली. क्रेटामधील प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या, पण सर्वजण सुखरूप आहेत.
कोण आहे प्रतीक?
प्रतीक राम शिंदे (२४) हा इंदापूरमधील सोशल मीडिया रील स्टार आहे. त्याचे रेसिंग, स्टंट आणि लक्झरी कार्सचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्सना आकर्षित करतात. त्याने महिन्याभरापूर्वीच टोयोटा फॉर्च्युनर खरेदी केली होती, ज्याचे फोटो आणि रील्स त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. प्रतीक स्वतः फॉर्च्युनर चालवत होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, जास्त वेग आणि अचानक ओव्हरटेकिंगमुळे हा अपघात घडला. त्याच्या गाडीने क्रेटाला बाजूने धडक दिल्याने साखळी अपघात झाला. भिगवण पोलिसांनी फिर्यादी निखील होले यांच्या तक्रारीवरून प्रतीकविरुद्ध निष्काळजी ड्रायव्हिंगसाठी गुन्हा दाखल केला आहे.





