solapur mayor election : सोलापूर महापालिकेत मराठा समाजाला महापौरपदाची संधी डावलल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांविरोधात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे. याठिकाणी यंदा महापौरपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव होते. सोलापुरात 1993 नंतर पहिल्यांदाच मराठा समाजाला महापौरपदाची संधी आली होती. मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वतःच्या नातेवाईकांना ही संधी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महापालिकेत अडीच वर्षापैकी सव्वा वर्षे महापौरपद आणि जिल्हा परिषदेतही कुणबी मराठा समाजाला अध्यक्ष करावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर राज्यभरात आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला आहे. याठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात भाजपने आपला महापौर बसवला आहे. सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या विनायक कोंड्याल आणि उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सोलापूरात 87 नगरसेवकांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांना स्पष्ट बहुमत आहे.