पालकमंत्री हरवले आहेत!!! बुलढाण्यात शरद पवार गटाकडून थेट तक्रार दाखल

Makarand Patil And Sanjay Savakare | महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. सिंदखेड राजासह परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. असे असताना पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) करण्यात आला आहे. इतकेच काय तर बुलढाणा जिल्ह्यातील पालकमंत्री हरवल्याची तक्रारही शरद पवार गटाकडून पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी २४ सप्टेंबर रोजी पोलिसात तक्रार दाखल करून दोन्ही मंत्र्यांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. तसेच मंत्र्यांचा शोध लावणाऱ्यास ११ रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांना देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद आहे की, परतीच्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी पिके खरडून गेली आहेत. अशा परिस्थितीत पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी जिल्ह्याकडे लक्ष दिलेले नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांनी भेट दिल्याचे दिसून आले नाही.
दोन्ही मंत्री फक्त एसी रूममधून अधिकाऱ्यांना सूचना देतायत
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, दोन्ही मंत्री फक्त एसी रूममधून अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत, पण शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत.त्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांचे नुकसान पाहणे अपेक्षित होते. त्यामुळे मंत्र्यांचा शोध घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवावे, अशी मागणी तक्रारीत आहे. या तक्रारीदरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. संतोष तायडे, तालुकाध्यक्ष संजय बगाडे, अल्पसंख्याक नेते शेख अयाज, डॉ. ज्ञानेश्वर रावनकार, संतोष पेसोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
संजय सावकारे यांचे स्पष्टीकरण
याबाबत सहपालकमंत्री संजय सावकारे म्हणाले, “शासनाचा जीआर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी बुलढाण्यात होतो. सर्व विभागांच्या बैठका घेऊन नुकसानीची माहिती घेतली. यापूर्वी मलकापूर येथील गावांना भेट दिली. सोमवारी रात्री पाऊस झाला तेव्हा मी ट्रेनमध्ये होतो, कारण दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक होती. काल माझ्या भागात ढगफुटी झाल्याने तिथे दौरा केला, पण आता मी बुलढाण्याला निघत आहे. तसेच माझी पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याशी आणि मुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा झाली आहे.”
सिंदखेड राजा तालुक्यात दुसरबीड आणि सोनोशी या महसूल मंडळात ढगफुटी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नदी काठावरील शेती खरडून गेली आहे. अक्षरशः हात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे आता दिवाळी कशी साजरी करायची, असा संतप्त सवाल नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. Makarand Patil And Sanjay Savakare |
हेही वाचा:




