Rain Updates : चिंता वाढली! मान्सूनच्या वाटेत नवे संकट; हवामान खात्याचा 21 जिल्ह्यांना अलर्ट
Rain Updates : मुंबईत तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्याने नागरिक उष्णतेने हैराण झाले आहेत. पुढील आठवड्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Rain Updates : महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाचा वेग मंदावला असून त्याची पुढील प्रगती सध्या थांबलेली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस हर्णे-दापोली परिसरापर्यंत पोहोचला असला, तरी पुढे सरकण्यासाठी आवश्यक वातावरण अनुकूल नसल्याने मान्सूनची वाटचाल रखडल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना उकाडा आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागत आहे.
राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत असून अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, मान्सून संपूर्ण राज्यभर सक्रिय होण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईत तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्याने नागरिक उष्णतेने हैराण झाले आहेत. पुढील आठवड्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
एल निनोचे संकट
दरम्यान, एल निनोचा वाढता प्रभावही चिंतेचा विषय ठरत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, एल निनोमुळे काही भागांत पाऊस उशिरा दाखल होऊ शकतो, तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमानाची शक्यता आहे. दुसरीकडे काही भागांमध्ये अल्पावधीत अतिवृष्टी होण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी उष्णता आणि पावसाचे अलर्ट जारी केले आहेत.
हेही वाचा : PMC News: आता पालिकेत एन्ट्रीसाठी पाळावे लागणार ‘हे’ कडक नियम; बॉम्बच्या धमकीनंतर स्थायीचा निर्णय
कुठे यलो तर कुठे अॅारेंज अलर्ट
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठीही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये अधिकृत अलर्ट नसला तरी स्थानिक पातळीवर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत हवामान मुख्यतः कोरडे राहण्याचा अंदाज असला, तरी काही भागांत हलक्या पावसाची शक्यता कायम आहे. वाढत्या तापमानामुळे उकाड्याचा त्रासही कायम राहणार आहे.
विदर्भात भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या भागांत जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.
परभणी आणि भंडाऱ्यात जोरदार
दरम्यान, परभणीमध्ये गुरुवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यांमुळे काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला, तर झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटनाही घडल्या. पावसानंतर तापमानात घट होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला.
भंडारा जिल्ह्यातही दुपारनंतर अचानक हवामान बदलले आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. भंडारा शहरासह तुमसर, लाखनी, पवनी आणि मोहाडी तालुक्यांमध्ये पावसाने दमदार उपस्थिती दर्शवली. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी खरीप हंगामाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांची नजर अद्याप नियमित आणि समाधानकारक मान्सूनकडे लागून आहे.






