PMC News: आता पालिकेत एन्ट्रीसाठी पाळावे लागणार ‘हे’ कडक नियम; बॉम्बच्या धमकीनंतर स्थायीचा निर्णय
PMC News: बॉम्ब धमकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; अभ्यागतांसाठी सर्वंकष नियमावली बनवण्याचे स्थायी समितीचे आदेश.

PMC News – महापालिका बाॅम्बने उडवून देण्याची धमकी आल्यानंतर पालिकेत भेटीसाठी येणाऱ्यांना आता नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. नियामावली दहा दिवसांत स्थायी समितीसमोर मांडण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. बॉम्ब धमकीमुळे पालिकेतील सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. पहिल्या झटक्यातच २०० सुरक्षा रक्षकांच्या ओळखपत्राचा विषय चर्चेचा झाला.
सुरक्षा रक्षकच गळ्यात नुसती दोरी अडकवून फसवणूक करत असल्याचे लक्षात आले. सुरक्षा यंत्रणाच फसवी असेल तर येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीचे काय हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. पालिकेत येण्या-जाण्यासाठी अनेक प्रवेशद्वार आहेत. या प्रवेशद्वारातून येण्या-जाण्याच्या मार्गावर सुरक्षा रक्षक नेमले आहेत. हे सुरक्षा रक्षक प्रत्येकाच्या बॅगेची तपासणी करतात.
त्याही पुढे जाऊन आता, ती व्यक्ती कोणत्या कामासाठी, कोणत्या विभागात, कोणाला भेटायला आला आहे, याची माहिती घेऊन नागरिकाला व्हिजीटर पास देण्यात येणार आहे. तसेच भेटण्याची वेळही ठरवली जाणार आहे. अशा अभ्यागत नियमांचा समावेश करून एक सर्वंकष नियमावली बनवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

