Project X party Tulapur: ‘प्रोजेक्ट एक्स’ रेव्ह पार्टीचा तपास का रेंगाळला? ६ दिवस झाले तरी मद्य, गांजाचा सोर्स गुलदस्त्यात
Project X party Tulapur: तुळापूर येथील आलिशान बंगल्यातील कारवाईला ६ दिवस पूर्ण; ७८ जणांवर गुन्हे दाखल होऊनही मुख्य पुरवठादार अद्याप फरार.

Project X party Tulapur – तुळापूर येथील आलिशान बंगल्यात आयोजित करण्यात आलेल्या कथित प्रोजेक्ट एक्स हाउस रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धडक कारवाई करत आयोजकांसह ७८ जणांविरोधात गुन्हे दाखल केले. मात्र, कारवाईनंतर तब्बल सहा दिवस उलटूनही तपासात अपेक्षित प्रगती झाली नसल्याने संपूर्ण प्रकरणाच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या पार्टीतून पोलिसांनी सुमारे साडेनऊ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मद्यसाठा, प्रतिबंधित १० हुक्का पॉट्स, तसेच इतर साहित्य जप्त केले होते. याशिवाय गांजाही आढळला होता. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात मद्य नेमके कुठून आणले, पुरवठादार कोण होता, हुक्क्याचे साहित्य कोणी उपलब्ध करून दिले आणि गांजा पार्टीपर्यंत कसा पोहोचला, याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही.
मंगळवारी पोलिसांनी प्रमुख आयोजकांपैकी यश चौधरीसह दोन जणांची सखोल चौकशी केली. पार्टीचे नियोजन, सहभागी व्यक्ती, मद्य व हुक्क्याचा पुरवठा आणि आर्थिक व्यवहाराबाबत माहिती घेतली. मात्र, या चौकशीतूनही तपासाला निर्णायक दिशा मिळाल्याचे दिसून आलेले नाही. तपासादरम्यान कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये शहरातील मिल्स परिसरातील काही नामांकित पबशी संबंधित व्यक्तींचा सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे,
तसेच संबंधित आयोजकाने यापूर्वी दिल्लीमध्येही अशाच पार्ट्यांचे आयोजन केल्याचे निष्पन्न झाल्याची चर्चा आहे, तरीही या संपूर्ण नेटवर्कच्या मुळाशी पोहोचण्यात तपास यंत्रणांना अपयश आल्याचे दिसते. यामुळे पुणे आणि परिसरात खुलेआम अवैध पार्ट्या, हुक्का आणि मद्यपुरवठ्याचे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त होत असून, त्यावर प्रभावी कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
पर्दाफाश होणार का?
पार्टीवरील कारवाईनंतर सुरुवातीला गाजावाजा झाला, तरी सहा दिवसांनंतरही पुरवठा साखळी, आर्थिक व्यवहार आणि आयोजकांच्या नेटवर्कबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे हे प्रकरण केवळ गुन्हा नोंदविण्यापुरते मर्यादित राहणार, की अवैध पार्टी, हुक्का आणि अमली पदार्थांच्या रॅकेटपर्यंत तपास पोहोचणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.





