नातवासाठी आजोबांची मतदारसंघात साखरपेरणी!
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे कर्जत-जामखेडकडे विशेष लक्ष; शिंदेंच्या होमपीचवर करणार शक्तिप्रदर्शन
जामखेड – विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून, तापमानाच्या पाऱ्याबरोबर निवडणुकीचा आखाडा तापला आहे. भाजपच्या बाल्लेकिल्ल्यात राष्ट्रवादीकडून रोहित पवार यांच्या उमेदवारीने मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात नेत्यांसह कार्यकर्ते चांगलेच सक्रिय झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
शरद पवार यांनी कर्जत-जामखेड तालुक्यांकडे विशेष लक्ष दिले असून, रोहित पवार यांच्या विधानसभेची साखरपेरणी ते करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कायम दुर्लक्षित असणारा मतदारसंघ म्हणून कर्जत-जामखेड तालुक्याकडे पहिले जात होते. हा मतदारसंघ तसा भाजपचा बाल्लेकिल्ला आहे. सन 2009 पासून आतापर्यंत पालकमंत्री राम शिंदे या मतदारसंघाचे नेतृत्व करत आलेले आहेत. 2014 रोजी राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर प्रथमच कर्जत-जामखेड तालुक्यांना शिंदे यांच्या माध्यमातून मंत्रिपद मिळाले.
त्यानंतर तालुक्यात विकासकामे करत असताना दोन्ही तालुक्यांत एकही नेता ना. शिंदे यांनी विधानसभेसाठी तयार होऊ दिला नाही. त्यानंतर गेल्या एकवर्षापासून इंडियन शुगर मिलचे अध्यक्ष व बारामती ऍग्रोचे सीईओ रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडमध्ये एन्ट्री करत चाचपणी सुरू केली. तसेच राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवत अर्ज दाखल केला.
भाजपच्या बाल्लेकिल्यात पवार यांनी मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क वाढवल्याने राम शिंदे याना एकतर्फी वाढणारी निवडणूक अतितटीची झाली आहे. अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या गळाला, तर भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या गळाला लागू लागल्याने निवडणुकीचे वातवरण चांगलेच तापू लागले आहे.
मावळ लोकसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव झाल्याने कर्जत-जामखेड तालुक्यात रोहित पवार यांनी उमेदवारी केल्याने पवार कुटुंबीय आता ताकही फुंकून पिऊ लागले असून, कर्जत-जामखेड मतदारसंघाकडे राष्ट्रवादीचे सर्वेसार्वा शरद पवार यांनीही विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीकडून दुरावलेल्या जुन्या कार्यकर्त्यांची पवार यांच्याकडून एकत्र मोट बांधली जात आहे. शरद पवार यांच्यावर राज्याची मोठी जबाबदारी आहे. एक तर राज्यातील दिग्गज नेते शरद पवार यांनी साथ सोडून गेल्याने ते राज्यात राष्ट्रवादीची नवबांधणी करत आहेत.
यातूनही वेळ काढून पवार कर्जत-जामखेडकडे विशेष लक्ष देत आहेत. त्यामुळे शरद पवार काय जादूची कांडी फिरवतात, ते आगामी काळातच समजेल. पवार यांनी आपल्या सोयीनुसार मतदारसंघात विधानसभेची राजकीय गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे. पुढील काळात भाजपतून बंडाचे निशाण फडकावत पक्ष बदलणाऱ्या नेत्यांची संख्या राष्ट्रवादीत वाढेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत असून, नंतरच्या काळात कोण व कोणासोबत युती, आघाडी करणार हे, आताच सांगणे कठीण आहे.





