पुण्यात भव्य रोजगार मेळावा: 397 जणांची नोंदणी, 149 जणांना मिळणार नोकरी

पुणे : सुशिक्षित बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यातील टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात “पंडित दीनदयाल उपाध्याय” रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे आणि खडकी शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात पुणे शहर आणि परिसरातील 397 जणांनी नोकरीसाठी नावनोंदणी केली, त्यापैकी 149 जणांची नोकरीसाठी निवड झाली आहे.
या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना खडकी शिक्षण संस्थेचे विश्वस्त कृष्णकुमार गोयल म्हणाले, “समाजातील सुशिक्षित बेरोजगारीवर मात करण्यासाठी मुलाखत यंत्रणा प्रभावीपणे राबवणे ही काळाची गरज आहे. अशा मेळाव्यांमुळे तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतात आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होते.” महाविद्यालयाचे प्राचार्य व सहसचिव डॉ. संजय चाकणे यांनी खडकी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थीहिताच्या कार्याचा गौरव करताना सांगितले, “आमची संस्था नेहमीच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कार्यरत आहे. भविष्यातही अशा रोजगार मेळाव्यांचे आयोजन करून तरुणांना संधी उपलब्ध करून देण्याची आमची योजना आहे.”
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या उपायुक्त अ. ऊ. पवार यांनी मेळाव्याचे उद्दिष्ट आणि महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “या मेळाव्याचा उद्देश तरुणांना कौशल्यावर आधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि उद्योजकता वाढवणे आहे.” संस्थेचे सचिव आनंद छाजेड यांनी भविष्यातील रोजगार संधी आणि त्यासाठी आवश्यक कौशल्यांबाबत माहिती दिली.
या मेळाव्याला महाविद्यालयाचे उपप्राचार्य राजेंद्र लेले, जिल्हा कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर मोहिते, संचालक ॲड. अजय सूर्यवंशी, रमेश अवस्थी, मधुकर टिळेकर, उपप्राचार्या सुचेतादळवी, प्रा. ज्योती वाघमारे आणि खडकी शिक्षण संस्थेतील सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शितल रणधीर यांनी केले, तर जिल्हा कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर मोहिते यांनी आभार प्रदर्शन केले. या भव्य मेळाव्याचे यशस्वी आयोजन डॉ. शितल रणधीर यांच्या नेतृत्वाखालील महाविद्यालयीन समितीने केले.





