Gramin News : शिरूर बसस्थानकातील स्वच्छतागृहात महिलांची कुचंबना थांबेना…; मुजोर ठेकेदार पोलिस स्टेशनला जुमानेना

शिरूर : शिरूर शहरातील बस स्थानकात गंभीर व धक्कादायक प्रकार घडत असून महिलांच्या स्वच्छता गृहात पैसे घेण्यासाठी चक्क एका मुलाची नेमणूक केल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी त्या ठिकाणी एक वृद्ध माणूस पैसे घेत होता. पैसे देण्यास नकार दिल्यास किंवा सुट्टे पैसे नसल्यास अनेकदा महिलांशी अर्वाच्य भाषेत बोलत असल्याच्या तक्रारी प्रवासी महिला व सामाजिक संघटनांनी केल्यानंतर या वृद्धाला काढून महिलेची नेमणूक न करता सदर ठिकाणी मुलाची नेमणूक केली आहे. या बसस्थानकात आगार प्रमुख म्हणून एक महिला अधिकारी काम पाहत आहे.
या महिलेला हे कृत्य दिसत नाही का? एखादा अनुचित प्रकार जर घडला तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न महिला वर्गाकडून उपस्थित होत आहे. महीलांच्या स्वच्छतागृहात मुलाची नेमणुक करण कितपत योग्य आहे? एखादा अनुचित प्रकार घडण्याची प्रशासण वाट पाहत आहे का? बेकायदा वसुली या ठिकाणी होत असल्याचे निदर्शनात येत आहे. याचा मलिदा कोणाकोणाला मिळतो याची चौकशी होणे गरजेचे आहे. शिरूर पोलिसांच्या आदेशाला न जुमानणाऱ्या ठेकेदारावर आता शिरूरचे दबंग पोलिस निरीक्षक कारवाई करणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.
बसस्थानक परिसर व स्वच्छता गृहात घाणीचे साम्राज्य…
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. याबाबत शिरूर आगारात सर्वेक्षण झाले आहे. सर्वेक्षणासाठी वरीष्ठ अधिकारी येणार असल्याच्या दिवशी स्वच्छता केल्याचा दिखावा करत बक्षीस मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या एसटीच्या अधिका-यांना बसस्थानक परिसरातील व स्वच्छता गृहातील अस्वच्छता दिसत नाही का?
तक्रारी नंतर मुजोर कर्मचाऱ्याला केवळ १०० ते २०० रूपये दंड करून कागदोपत्री कारवाई दाखवण्यात येत असून पुन्हा हाच प्रकार घडत असल्याने प्रवासी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. सदर प्रकाराबाबत तात्काळ दखल घेऊन मुजोर कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी.
तसेच महिला स्वच्छतागृहाच्या बाहेर महिला कर्मचारी नेमणूक करण्याची मागणी सामाजिक संघटनांकडून करण्यात आली आहे. याबाबत तात्काळ दखल न घेतल्यास सामाजिक संघटनांकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत एसटीचे वरीष्ठ कार्यालय, पोलिस प्रशासन कारवाई करणार कि या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.





