Pune District : जुने आंबेगावात तब्बल ५० वर्षानंतर पहिल्यांदा ग्रामसभा

मंचर : जुने आंबेगाव (ता.आंबेगाव) येथील आदिवासी कातकरी समुदायाच्या वस्तीची व नागरिकांची नोंद झाल्याने या स्वतंत्र महसुली गावाची पहिली ग्रामसभा तब्बल ५० वर्षांनी पार पडली आहे. कातकरी वस्तीवर नव्याने तयार झालेल्या जुने आंबेगाव स्वतंत्र महसूल गावाची ग्रामसभा सरपंच विजय जंगले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या ग्रामसभेत पाणी, लाईट, घर, रोजगार या मुलभूत प्रश्नांच्या पूर्ततेसाठी चर्चा करण्यात आली. कुकडी प्रकल्पातील हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण १९७२ सुरू झाले व २००० ला पूर्ण झाले. मात्र, या धरणामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांची परवड झाली. यामधील आदिवासी कातकरी समुदायाला तर गाव आणि ग्रामपंचायतच मिळाली नव्हती. अखिल भारतीय किसान सभा, ग्रामपंचायत बोरघर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तब्बल आठ वर्षांनी या आदिवासी कातकरी जमातीच्या व्यक्तींची नोंद ग्रामपंचायत मिळाल्याने शासन दप्तरी झाली.
आजपर्यत या येथील कित्येक व्यक्तीची जन्माची वा मृत्यूची नोंद झालेली नाही. अनेकांकडे कागदपत्रे नाहीत. त्यामुळे मुलभूत सुविधांपासून आजतागायत हा समुदाय वंचित राहिला. मात्र, लोकप्रतिनिधी आणि शासनाने यांच्याकडे लक्ष दिलेले नव्हते. यावेळी जुने आंबेगाव स्वतंत्र महसूल गावाची ग्रामकोष समितीमध्ये एक महिला प्रतिनिधी व एक पुरुष प्रतिनिधी यांची निवड करून ही समिती स्थापन करण्यात आली. तसेच यावेळी उपस्थित नागरिकांना सहाय्यक प्रकल्प अधिकारी सोनुल कोतवाल यांनी आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व उपक्रमांची माहिती दिली.
नायब तहसीलदार, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांनी देखील यावेळी उपस्थितांना मार्गर्शन केले.यावेळी बोरघर गावचे सरपंच विजय जंगले, उपसरपंच राजेंद्र घोडे, सदस्य कल्पना किर्वे, नायब तहसीलदार शांताराम किर्वे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सोनुल कोतवाल, ग्रामपंचायत अधिकारी संजय जोशी, गृहपाल विपुल टकले, आदिम संस्थेचे सहाय्यक व्यवस्थापक समीर गारे, तलाठी प्रशांत बरे, पोलीस पाटील जमुना शेळके आदी मान्यवर व ग्रामस्थ यावेळी या ग्रामसभेस उपस्थित होते.





