Bhor : शिवरेतील ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या मृत्यूचा भोरमध्ये निषेध; ग्रामसभा बहिष्काराला गटविकास अधिकाऱ्यांचा पाठिंबा
Bhor : शिवरे ग्रामपंचायतीतील अधिकारी पी. एन. पाटील यांच्या मृत्यूचा भोरमध्ये निषेध. ग्रामसभा बहिष्कार आंदोलनाला गटविकास अधिकाऱ्यांचा पाठिंबा.

Bhor : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे ग्रामपंचायतीत १७ ऑगस्ट रोजी ग्रामसभेदरम्यान झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेचा भोर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने तीव्र निषेध केला. याप्रकरणी पंचायत समिती, भोर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE-136, भोर तालुका शाखेच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली.
यावेळी पंचायत समिती भोरचे गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त करून दिवंगत अधिकारी पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने घेतलेल्या निर्णयाला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामसभा ही गावाच्या विकासासाठी आणि लोकशाही प्रक्रियेसाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे. मात्र ग्रामसभेदरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धमकी, अपमान, मानसिक दबाव किंवा शासकीय कामात अडथळा आणण्याच्या घटना घडत असतील, तर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याचे संघटनेने नमूद केले.
ग्रामपंचायत अधिकारी हा शासन आणि ग्रामीण जनता यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. शासनाच्या विविध योजना, विकासकामे, निवडणूक व जनगणना विषयक कामे, आपत्ती व्यवस्थापन तसेच ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक असल्याचे संघटनेने सांगितले.
शिवरे येथील घटना ही केवळ एका अधिकाऱ्याच्या मृत्यूची बाब नसून संपूर्ण ग्रामपंचायत विभागाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर इशारा असल्याचे संघटनेने म्हटले. ग्रामसभा व इतर शासकीय कामकाजावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण द्यावे, गैरवर्तन करणाऱ्यांवर तसेच शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, मानसिक छळ, धमकी आणि सोशल मीडियावरील बदनामी रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE-136 राज्य शाखेच्या निर्णयानुसार ग्रामसभा बहिष्कार आंदोलनास भोर तालुका शाखेने सक्रिय पाठिंबा जाहीर केला. संबंधित मागण्यांवर शासनस्तरावर ठोस निर्णय होईपर्यंत संघटनेच्या निर्णयानुसार पुढील भूमिका घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष नवनाथ झोळ, सचिव महेश कालेकर, उपाध्यक्ष परमेश्वर खटके, कोषाध्यक्ष अशोक ढवळे, कार्याध्यक्ष भूषण पुरोहित, प्रसिद्धीप्रमुख सुनील भोकरे, कार्यकारिणी सदस्य योगेश चव्हाण यांच्यासह भोर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या शेवटी दिवंगत ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि भविष्यात कोणत्याही ग्रामपंचायत अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली.





