Malavali : ग्रामपंचायतीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे; मळवलीतील प्रलंबित प्रश्नांसाठी उपोषण
Malavali : वैभव तिकोणे आणि विजय कांबळे यांनी ग्रामस्थांच्या वतीने उपोषण सुरू केले होते

Malavali : मळवली गावातील स्मशानभूमीच्या प्रलंबित कामांसह विविध स्थानिक प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने सुरू करण्यात आलेले एकदिवसीय उपोषण ग्रामपंचायतीकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर मागे घेण्यात आले. ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले.
मळवली येथील त्रिमूर्ती नगर परिसरातील स्मशानभूमीच्या जागेवर वैभव तिकोणे आणि विजय कांबळे यांनी ग्रामस्थांच्या वतीने उपोषण सुरू केले होते. उपोषणस्थळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. उपोषणकर्त्यांनी प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या मांडल्या होत्या.
यामध्ये स्मशानभूमीचे रखडलेले काम तातडीने सुरू करणे, गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटविणे आणि गावतळाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे या मागण्यांचा समावेश होता. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.
मात्र त्यावर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला होता.
दरम्यान, ग्रामपंचायतीने उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मावळ पंचायत समितीच्या सभापती सुनीता येवले, उपसभापती साहेबराव कारके, एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, पंचायत समिती सदस्या रेश्मा देवकर, विस्तार अधिकारी बी. आर. मतकर, ग्रामसेवक गजानन जाधव आणि तलाठी दीपक धनवडे यांच्या हस्ते सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे, मनोज येवले, राजू देवकर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.
Satara: … तर माझा पहिला क्रमांक असेल नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचे प्रत्युत्तर





