Gram Panchayat Election : आंबेगावात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला! ‘या’ २८ गावांच्या सदस्य आरक्षणाची सोडत १२ जूनला
Gram Panchayat Election : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आंबेगाव तालुक्यात सोमवारपासून ग्रामसभेची अधिसूचना प्रसिद्ध होऊन निवडणूक प्रक्रिया गतिमान होणार.

Gram Panchayat Election – आंबेगाव तालुक्यातील मुदत संपलेल्या तसेच आगामी काळात मुदत संपणार्या 28 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत शुक्रवार, दि. 12 जून रोजी काढण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबतचा कार्यक्रम जाहीर केल्याची माहिती तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी दिली.
सन 2024 व 2025 मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन 2026 मध्ये मुदत संपणार्या ग्रामपंचायतींचा या प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कोलदरा-गोनवडी, धोंडमाळ-शिंदेवाडी, रानमळा, काळेवाडी-दरेकरवाडी, थुगाव, गिरवली, शिंगवे, काठापूर बुद्रुक, जवळे, शिरदाळे, लौकी, वळती, भराडी, पिंपळगाव, म्हाळुंगे, म्हाळुंगे पडवळ, पेठ, कोरेगाव, कोळवाडी-कोटमदरा,
पिंगळवाडी-लांडेवाडी, खडकी, चिंचोली, एकलहरे, भागडी, साकोरे, गावडेवाडी, खडकवाडी, शेवाळवाडी आणि अवसरी खुर्द या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आरक्षण सोडतीसाठी सोमवार, दि. 8 जून रोजी ग्रामसभेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवार, दि. 12 जून रोजी ग्रामसभेत प्रत्यक्ष आरक्षण सोडत काढण्यात येईल. पुढे शुक्रवार, दि. 19 जून रोजी प्रारूप आरक्षण प्रसिद्ध केले जाणार आहे.
प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत 19 ते 25 जून अशी राहणार आहे. प्राप्त हरकती व सूचनांवर प्रांताधिकार्यांचा अभिप्राय 3 जुलै रोजी सादर करण्यात येणार असून, 10 जुलै रोजी अंतिम प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले जाणार असल्याचे तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आरक्षण प्रक्रियेकडे संबंधित गावांतील नागरिक, राजकीय कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.




