Gram Panchayat Election: सोशल मीडियावर ‘भावी’ सरपंचांची एन्ट्री! ग्रामपंचायत आरक्षण सोडतीनंतर गावागावांत वातावरण तापले
Gram Panchayat Election: निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याआधीच सोशल मीडियावर 'भावी सरपंच' आणि 'भावी उपसरपंच' पदाच्या पोस्ट्सचा धडाका.

Gram Panchayat Election – तालुक्यातील मुदत संपलेल्या तसेच लवकरच मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी नुकतीच आरक्षण सोडत पार पडताच गावागावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. आरक्षणाची घोषणा होताच इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियावर प्रचाराचा धडाका लावत डिजिटल माध्यमांवर शुभेच्छा संदेश, बॅनर आणि पोस्टच्या माध्यमातून स्वतःची उपस्थिती दाखवण्यास सुरुवात केली आहे. आरक्षण सोडतीमुळे अनेक गावांतील राजकीय गणिते बदलली असून काही इच्छुकांचे स्वप्न भंगले, तर काहींना निवडणूक लढविण्याची नवी संधी मिळाली आहे.
त्यामुळे प्रत्येक गावात नवीन समीकरणे तयार होत असून संभाव्य उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जात आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसतानाही सोशल मीडियावर प्रचाराला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी वाढदिवस, शुभेच्छा किंवा सामाजिक उपक्रमांच्या निमित्ताने प्रसिद्ध होणारे पोस्टर आता अप्रत्यक्ष प्रचाराचे माध्यम बनल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, मतदारवर्गही सोशल मीडियावरील या प्रचाराचा बारकाईने आढावा घेत आहे.
प्रत्येक नवीन पोस्ट, बॅनर किंवा व्हिडिओ गावागावात चर्चेचा विषय ठरत असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तरुण वर्ग सोशल मीडियावरून उमेदवारांची सक्रियता पाहत असताना ज्येष्ठ मतदार मात्र प्रत्यक्ष कामगिरी आणि विकासकामांच्या आधारावरच निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. काही नागरिकांच्या मते, आधुनिक काळात सोशल मीडिया हे प्रभावी प्रचारमाध्यम बनले असले तरी केवळ पोस्ट आणि बॅनर लावून जनतेचा विश्वास संपादन करता येत नाही.
गावाच्या विकासासाठी केलेली कामे, लोकांशी असलेला संपर्क आणि समस्या सोडविण्याची क्षमता यालाच मतदार अधिक महत्त्व देतात. त्यामुळे प्रचाराबरोबरच प्रत्यक्ष कृतीही महत्त्वाची असल्याची भावना व्यक्त होत आहे. निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्यास अजून वेळ असला तरी गावागावात राजकीय चर्चांना वेग आला आहे. इच्छुकांच्या भेटीगाठी, पडद्यामागील हालचाली, मतदारांशी वाढलेला संपर्क आणि सोशल मीडियावरील प्रचार यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुका रंगतदार आणि चुरशीच्या होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भावी पदवीची गावागावांत चर्चा
अद्याप निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झालेला नसतानाही सोशल मीडियावर अनेकांनी स्वतःला भावी सरपंच आणि भावी उपसरपंच म्हणून संबोधणारे बॅनर प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे या बॅनरची गावागावांत चांगलीच चर्चा रंगली असून नागरिकांमध्ये हे भावी खरोखरच सरपंच होतील की केवळ सोशल मीडियापुरतेच राहतील? अशा मिश्कील प्रतिक्रिया मतदारांकडून उमटताना दिसत आहेत. काही मतदार याकडे मनोरंजन म्हणून पाहत असून, समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात सक्रिय राहणाऱ्या तरुणांमध्ये या बॅनरची विशेष चर्चा रंगताना दिसत आहे.





