Khalapur News : खालापूर नगरपंचायतीत तीव्र संताप! ८१ वर्षांच्या माजी सरपंचांना मुख्याधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक?
Khalapur News : मुख्याधिकारी कोमल कराळे यांनी खालापूरच्या माजी सरपंच मनोरमा (बेबी) साळवी यांच्याशी अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप करत नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर निषेध व्यक्त केला.

Khalapur News – खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी कोमल कराळे यांनी खालापूरच्या माजी सरपंच मनोरमा (बेबी) साळवी यांच्याशी अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप करत नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर निषेध व्यक्त केला. तसेच मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि तात्काळ बदली करावी, अशी मागणी करणारे निवेदन नगराध्यक्षा रोशना मोडवे आणि तहसीलदार यांना देण्यात आले.
मनोरमा साळवी (वय ८१) या खालापूर ग्रामपंचायतीच्या तीन वेळा सरपंच राहिल्या असून तंटामुक्ती समिती, शांतता समिती तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्या सक्रियपणे कार्यरत आहेत. आदिवासी बांधवांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह खालापूर येथील शंकर मंदिराजवळील विहिरीची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्याबाबतची लोकहिताची मागणी मांडण्यासाठी गुरूवारी त्या नगरपंचायत कार्यालयात गेल्या होत्या.
यावेळी काही दिवसांपूर्वी घरपट्टी प्रश्नावर काढलेल्या मोर्चात सहभागी झाल्याचा राग मनात धरून मुख्याधिकारी कोमल कराळे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना दालनाबाहेर बसण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात अतुल साळवी यांनी इशारा देताना सांगितले की, मुख्याधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात आली नाही तर २२ जूनपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. यावेळी निवेदन देताना नगराध्यक्षा रोशना मोडवे, माजी उपनगराध्यक्ष संतोष जंगम, ज्येष्ठ नेते नवीनचंद्र घाटवळ, माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, नगरसेविका सुप्रिया साळुंखे, माजी नगरसेवक उमेश गावंड,
माजी उपसरपंच मंदा भोसले, महेश राठी, मिलिंद पाटील, दत्ताबुवा चाळके, मनोहर पत्की तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, मनोरमा साळवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्या कोणत्याही वैयक्तिक कामासाठी नव्हे तर सार्वजनिक आरोग्य, पिण्याचे पाणी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न मांडण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांकडे गेल्या होत्या. मात्र, त्यांच्याशी अत्यंत अपमानास्पद, असंवेदनशील आणि अयोग्य वर्तन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.





