Gram Panchayat Election: तळेगाव ढमढेरेत आरक्षणाचा मोठा झटका! १७ पैकी ९ जागा महिलांसाठी राखीव; पुरुष इच्छुकांचे पत्ते कट?
Gram Panchayat Election: तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत निवडणुकीत १७ पैकी ९ जागा महिलांसाठी राखीव झाल्याने राजकीय समीकरणांना मोठा धक्का; मातब्बर पुरुष नेते अडचणीत.

Gram Panchayat Election – ग्रामपंचायत निवडणुकीच्या आरक्षणाने तळेगाव ढमढेरेच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. जाहीर झालेल्या आरक्षणानुसार 17 सदस्यांपैकी 9 जागा महिलांसाठी राखीव आहेत. विशेष म्हणजे उर्वरित खुल्या जागांवरही महिलांना निवडणूक लढविण्यास कोणतीही अडचण नाही. शिवाय लोकनियुक्त सरपंचपद सर्वसाधारण असल्याने त्या पदासाठीही महिला उमेदवार रिंगणात उतरू शकतात.
आरक्षणाची घोषणा होताच अनेक पुरुष इच्छुकांच्या राजकीय गणितांना मोठा धक्का बसला आहे. गेली अनेक वर्षे निवडणुकीची तयारी करणारे, कार्यकर्त्यांचे जाळे उभे करणारे आणि गावातील राजकारणात सक्रिय असलेले अनेक पुरुष नेते आता आरक्षणाच्या समीकरणात अडकले आहेत. काहींना स्वतःऐवजी पत्नी, मुलगी, बहीण किंवा सुनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय राहावे लागणार आहे.
यंदाच्या निवडणुकीत पुरुष नेत्यांपेक्षा महिला उमेदवार केंद्रस्थानी राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोणत्या गटाकडे प्रभावी महिला नेतृत्व आहे, कोणत्या कुटुंबाची संघटनात्मक ताकद अधिक आहे आणि कोणत्या पॅनेलकडे सक्षम महिला उमेदवार आहेत, यावर निवडणुकीचे भवितव्य ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
तज्ज्ञांच्या मते, यंदाची निवडणूक ‘गट विरुद्ध गट’ किंवा ‘नेता विरुद्ध नेता’ अशी न राहता ‘प्रभावी महिला नेतृत्व विरुद्ध प्रभावी महिला नेतृत्व’ अशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक पारंपरिक पुरुष नेत्यांना नव्या वास्तवाशी जुळवून घ्यावे लागणार आहे. दुसरीकडे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही परिस्थिती सकारात्मक मानली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग केवळ आरक्षणापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत वाढला, तर गावाच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते, असे मत व्यक्त होत आहे. एकूणच, तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीत सर्वात मोठा प्रश्न आता ‘कोण जिंकणार?’ हा नसून ‘ग्रामपंचायतीवर महिलांचे संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित होणार का?’ हा ठरला आहे.
आरक्षणाच्या नव्या समीकरणांमुळे गावाच्या राजकारणात महिलाच केंद्रस्थानी राहणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. काही इच्छुकांनी मागील पाच वर्षांपासून निवडणुकीची तयारी केली, सामाजिक कार्यक्रम राबवले आणि कार्यकर्त्यांची फळी उभी केली. मात्र बदललेल्या आरक्षणामुळे आता त्यांना स्वतःऐवजी कुटुंबातील महिला सदस्यांना उमेदवारी द्यावी लागत आहे. त्यामुळे मेहनत आमची, प्रचार आमचा आणि उमेदवारी दुसर्याची अशी भावना काही कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
पुरुष कार्यकर्त्यांची वाढली घुसमट
तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीच्या आरक्षणानंतर महिलांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली असली, तरी अनेक पुरुष इच्छुकांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता दिसून येत आहे. गेली अनेक वर्षे गावच्या राजकारणात सक्रिय राहून विकासकामांसाठी पाठपुरावा करणारे, निवडणुकीची तयारी करणारे आणि स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे अनेक कार्यकर्ते आरक्षणामुळे थेट निवडणुकीच्या रिंगणाबाहेर गेले आहेत.





