पदवीधर, शिक्षक मतदारसंघ नोंदणीला वेग; मतदार नोंदणीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत

पुणे – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी कार्यक्रमाला वेग आला आहे. पात्र पदवीधर आणि शिक्षकांसाठी मतदार नोंदणीची अंतिम मुदत ६ नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मतदार नोंदणीसाठी तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केले आहे.
मतदार नोंदणी नियम १९६० च्या कलम ३१(४) नुसार, या मतदारसंघांसाठी नव्याने मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार पात्र पदवीधर आणि शिक्षकांना अर्ज भरून सादर करण्यासाठी ६ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या सभा, दप्तर व निवडणूक विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात ज्या पात्र कर्मचाऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी विनाविलंब अर्ज सादर करावेत, असे स्पष्ट केले आहे.
पदवीधर मतदारसंघ नोंदणीसाठी पात्र पदवीधरांना नमुना अर्ज क्रमांक १८, तर शिक्षक मतदारसंघ नोंदणीसाठी पात्र शिक्षकांना नमुना अर्ज क्रमांक १९ भरावा लागेल. हे अर्ज आपल्या निवासस्थानाच्या हद्दीतील मतदारसंघ कार्यालयातील मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे जमा करायचे आहेत.
यासोबतच, अर्जदारांनी आपल्या अर्जाची एक प्रत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सभा, दप्तर व निवडणूक विभागातही सादर करणे अनिवार्य आहे. सर्व पात्र नागरिकांनी वेळेत नोंदणी करून आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्या कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे यांनी केले आहे.





