राज्यात १७ हजार ५४२ खासगी पूर्व प्राथमिक शाळांकडून नोंदणी

पुणे – शालेय शिक्षण विभागाने राज्यातील खासगी पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी करण्याची सक्ती केली आहे. यामुळे आत्तापर्यंत तब्बल १७ हजार ५४२ शाळांची नोंदणी पोर्टलवर झाली आहे. यात आणखी काही वाढ होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
बालकांना शिक्षण देणाऱ्या प्री-स्कूल, नर्सरी, ज्युनिअर केजी, सीनिअर केजी, पूर्व प्राथमिक वर्ग अशा कोणत्याही नावाने सुरू असलेल्या खासगी शाळांची नोंदणी करताना त्यात खासगी शाळांच्या व्यवस्थापनाची माहिती, विद्यार्थी संख्या, भौतिक सुविधा, कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याबाबतची माहिती द्यावी लागत आहे.
राज्यात विविध ठिकाणी गल्लीबोळात खासगी पूर्व प्राथमिक शाळा सुरू आहेत. या शाळांची शिक्षण विभागाकडे कोणतीही नोंदच नव्हती. सद्यस्थितीत वय वर्षे तीन ते सहा वयोगटातील बालकांना अंगणवाड्या, बालवाड्या, शाळेला जोडून पूर्व प्राथमिक वर्ग आणि खासगी पूर्व प्राथमिक वर्गांद्वारे शिक्षण दिले जाते. खासगी बालवाड्यांची माहिती एकत्रित स्वरूपात राज्य, जिल्हा स्तरावर आणि पालकांनाही उपलब्ध असणे आवश्यक आहे.
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये शिक्षणाचा आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. प्रत्येक बालकाला मोफत, सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि वैकल्पिकदृष्ट्या सुयोग्य वातावरण मिळवून देणारे प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.
राज्यातील ११ हजार ५४ शाळांनी परिपूर्ण नोंदणी केलेली आहे. ६ हजार ४८८ शाळांची नोंदणी झाली असली तरी माहिती अर्धवट भरलेली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ६१७ शाळांनी नोंदणी केलेली आहे. तर, सिंधुदुर्गमध्ये सर्वात कमी ६० शाळांची नोंदणी झाली आहे.
जिल्ह्यानिहाय शाळा नोंदणी…
पुणे – २६१७, अहिल्यानगर – ८७४, अकोला – ३४८, अमरावती – ३८०, भंडारा – १६३, बीड – ३८१, बुलढाणा – २७२, चंद्रपूर – ३०६, छत्रपती संभाजीनगर – १०५७, धाराशीव-२०४, धुळे – २१४, गडचिरोली – १२३, गोंदीया – १६९, हिंगोली – १४७, जळगाव – ५२२, जालना – ३५२, कोल्हापुर – ५७१, लातुर – ४७०, मुंबई ( बीएमसी) – ५९३, मुंबई – १६६, नागपूर – १००४, नांदेड – ७२६, नंदुरबार- ८३, नाशिक – ८८७, पालघर – ३३४, परभणी – ४५२, रायगड – ४१६, रत्नागिरी – १३९, सांगली – ३५५, सातारा – ३०७, सिंधुदुर्ग – ६०, सोलापूर – ५९९, ठाणे – १६६८, वर्धा – १५०, वाशिम – १४९, यवतमाळ – २८४.





