Govinda : ‘हीरो नंबर वन’चा मॅरिज ड्रामा! गोविंदाच्या पत्नीकडून घटस्फोटासाठी याचिका
Sunita Ahuja | govinda : बॉलिवूडचा ‘हीरो नंबर वन’ गोविंदा पुन्हा एकदा वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याची पत्नी सुनीता आहुजा यांनी थेट बांद्रा फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे. सुनीता आहुजाने पतीवर फसवणूक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे.
सध्या गोविंदा वेगळा राहत असल्याने त्यांनी घटस्फोट मागितला आहे. ही याचिका हिंदू विवाह अधिनियम 1955 च्या कलम 13 (1) (i), (ia), (ib) अंतर्गत दाखल करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोर्टाने गोविंदाला २५ मे रोजी समन्स बजावले होते.
जूनपासून हे दाम्पत्य वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, सुनावणीदरम्यान सुनीता कोर्टात हजर राहिल्या, तर गोविंदा मात्र अनुपस्थित होता. यापूर्वी सुनीता आहुजाने तिच्या ब्लॉगमध्ये घटस्फोटाच्या अफवांवर भाष्य केले होते. पण आता त्यांनी थेट कायदेशीर पावलं उचलल्यामुळे ही चर्चा आणखी रंगली आहे.
दरम्यान, सुनीता महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गेल्या असताना भावनिक झाल्या. त्यांनी रडत-रडत सांगितले – “मी लहानपणापासून आईकडे (देवीकडे) येत आहे. माझं लग्न गोविंदाशी व्हावं, संसार सुखाचा व्हावा अशी प्रार्थना केली होती. आईने मला मुलांसह सगळ्या इच्छा पूर्ण केल्या.
पण आता संसार वाचवण्याचा संघर्ष सुरू आहे. माझं घर तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आई नक्की पाहून घेईल. एका चांगल्या माणसाला आणि बाईला दुःख देणं योग्य नाही. आईवर माझा विश्वास आहे, जी परिस्थिती निर्माण करेल त्यांना देवी माफ करणार नाही.”
गोविंदाची एका ३० वर्षांच्या मराठी अभिनेत्रीशी वाढती जवळीक हे त्यांच्या कथित विभक्त होण्याचं प्रमुख कारण आहे, असंही सांगण्यात आलं होतं. मात्र नंतर वकिलांनी सांगितलं की, या गोविंदा आणि सुनीताने सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र आता ते पुन्हा एकत्र येत आहेत.





