सरकारचा ‘यू-टर्न’! ‘लाडकी बहिण’ योजनेच्या ई-केवायसीला स्थगिती ; महिलांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय मलमपट्टी?

प्रभात वृत्तसेवा
इंदापूर – लोकप्रिय असलेल्या लाडकी बहिण योजनेतील ई-केवायसी प्रक्रिया सरकारने अखेर तात्पुरती स्थगित केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर महिला वर्गाची नाराजी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. या निर्णयामुळे महिलांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून लाभार्थी महिलांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. हजारो लाडक्या बहिणी इंदापूर तालुक्यातून या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारच्या कारभारावर उघडउघड नाराजी व्यक्त करत आहेत.
गेल्या वर्षी सुरु झालेल्या लाडकी बहिण योजनेने राज्यातील महिलांपर्यंत थेट आर्थिक मदत पोहचवून, राज्य सरकारसाठी मोठा राजकिय फायदा मिळवून दिला होता. विशेषतःविधानसभा निवडणुकी दरम्यान ही योजना सरकारसाठी गेम चेंजर ठरल्याचे मानले जाते; मात्र अलिकडेच राज्याच्या आर्थिक ताणाचा विचार करून, सरकारने कठोर भूमिका घेत महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया सक्तीची केली. त्यामुळे अनेक महिलांना हप्ता मिळण्यात अडथळे आले आणि नाराजी निर्माण झाली होती.
महिलांमधील असंतोष वाढत असल्याचे लक्षात घेऊन सरकारने, ई-केवायसी प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती पुढे येत आहे.ऑगस्ट 2025 पर्यंत 14 हप्त्यांचे वितरण पूर्ण झाले असून, सप्टेंबरसाठीची निधीही उपलब्ध झाल्याने योजनेचा वेग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
ईकेवायसी प्रक्रिया स्थगित करणे हा, निर्णय प्रशासकीय असला तरी, त्यामागे स्पष्टपणे राजकीय गणित दडलेले आहे, अशी चर्चा इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्हाभर रंगली आहे. महिलांच्या नाराजीचा सूर ओसरावा आणि आगामी निवडणुकांपूर्वी सरकार विषयीचा विश्वास परत मिळावा, यासाठीच ही तात्पुरती स्थगिती असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.
नाराजीवर राजकीय मलम..
इंदापूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात महिलांना थेट आर्थिक मदतीचा फायदा पोहोचविणारी ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा आधारस्तंभ ठरली होती. दरम्यान लाभार्थ्यांच्या पात्रतेची पडताळणी करतांना शासनाने काही महिलांना या योजनेतून वगळले आहे. यामध्ये चारचाकी वाहन धारक महिला, केंद्र व राज्य शासनाच्या अन्य योजनांचा लाभ घेण्यार्या लाभार्थी, शासकीय सेवेतील कर्मचारी, एकाच कुटुंबातील अनेक लाभार्थी भगिनी तसेच वयाची चुकीची नोंद किंवा निकषांचे उल्लंघन करणार्या महिला यांचा समावेश आहे. या सर्व अटीचा इंदापूर तालुक्यातील लाडक्या बहिणींना, मोठा फटका बसला आहे. ज्या बहिणींना या योजनेतून वगळले आहे. त्यांचा प्रचार मात्र आचारसंहिता लागण्या अगोदरच सरकारच्या विरोधात सुरू आहे.





