गुगल पे, मैत्री आणि अत्याचार! उच्च शिक्षीत तरुणीवर दोघांचा अत्याचार; तिसऱ्याने केली क्लिप व्हायरल

पुणे – हॉटेलमध्ये पेमेंट करण्यासाठी गुगल पे ऍपमुळे एका तरुणाबरोबर झालेली मैत्री उच्च शिक्षीत तरुणीला भलतीच महागात पडली आहे. संबंधीत तरुणाने आणि त्याच्या मित्राने तरुणीवर शारीरीक अत्याचार करत त्याचे चित्रीकरण केले. हे चित्रीकरण त्याच्या एका मित्राने सोशल मिडियावर व्हायरल करुन तीची बदमानी केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीघांनाही जेरबंद केले आहे.
विकी ऊर्फ विकास विनायक राठोड (21,रा.शिवांश हाईट्स,शिंदेनगर,मारुंजी गाव, पुणे, मुळपत्ता, ता.पैठण, जि.औरंगाबाद), निखील प्रताप पाटील (31,रा.मातोश्री बिल्डींग,शिंदेनगर,मारुंजी गाव,पुणे,मु.पो.खरोसा,ता.औंसा,जि.लातूर), अमर गोरखनाथ राठोड (23,रा.मु.पो.थापटी,तांडा,ता.पैठण,जि.औरंगाबाद ) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, एक उच्चशिक्षण घेत असलेली पिडीत तरुणी ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे आली व पोलीस स्टेशन मधील महीला अमंलदार यांना तिच्या सोबत घडलेला प्रकार हा सांगितला. पिडीत तरुणीस ब्लॅकमेल करुन, मारहाण करुन, बळजबरीने वांरवार अत्याचार केल्याचा प्रकार तिने सांगितला.
त्याक्षणी पिडीत मुलीकडुन आरोपीची माहीती घेवुन, तातडीने शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके नेमुन आरोपींचा माग काढण्यात आला. आरोपींना ताब्यात घेतल्यावर विकी आणी निखीलने अत्याचार केल्याची कबुली दिली. विकीने व्हीडीओ बनवुन तो व्हिडीओ अमरला पाठविल्यानंतर त्याने तो सोशल मिडीयावर व्हायरल करून, त्याव्दारे पिडीत तरुणीस धमकवल्याचे तपासात निष्पण झाले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, पोलीस निरिक्षक, विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उत्तम माने, उपनिरीक्षक अरविंद म्हस्के, पोलीस अंमलदार, अनिकेत भिंगारे, राहुल होळकर, तुकाराम म्हस्के, शरद राऊत व महीला पोलीस अमलदार मंगल काटे तसेच तपास पथकातील पोलीस उप निरिक्षक अतुल क्षिरसागर व सहायक फौजदार एकनाथ कंधारे, पोलीस हवालदार रणजित फडतरे, रुपेश वाघमारे, अविनाश भिवरे,कांतीलाल गुंड यांच्या पथकाने केली आहे.
चौकट : पिडीत तरुणी उच्च शिक्षणासाठी पुण्यात हॉस्टेलमध्ये वास्तव्य करते. रविवारी मेस बंद असल्याने ती मैत्रिणीसोबत जंगली महाराज रस्त्यावर हॉटेलमध्ये गेली होती. तेथे पेमेंट करताना तीच्याकडे गुगल पे नव्हते. यामुळे तीने तेथे जेवायला आलेल्या विकीला विनंती केली. त्याने गुगल पे करण्याचा प्रयत्न केला मात्र ते झाले नाही. मात्र त्या दरम्यान दोघांची मैत्री झाली आणी त्यांनी एकमेकांचे नंबर शेअर केले. विकी आणी निखील दोघेही नोकरीच्या शोधात पुण्यात आले आहेत. त्यांनी पिडीतेवर जवळीक वाढवत अत्याचार केले. यानंतर त्याचे चित्रीकरण गावाकडील मित्र अमरला पाठवले होते. अमरने ते व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केले.





