Pune : श्री महालक्ष्मी मंदिरात ‘नारी तू नारायणी’ सन्मान सोहळा; तीन कर्तृत्ववान महिलांचा गौरव
Pune : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे ‘नारी तू नारायणी’ सन्मान सोहळा झाला. सुमेधा चिथडे, डायना पंडोल आणि सत्यभामा देशमाने यांचा गौरव करण्यात आला.

Pune : समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने ‘नारी तू नारायणी’ सन्मान देऊन गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय फेरारी महिला रेसर डायना पंडोल, ‘ऑक्सिजन वुमन’ सुमेधा चिथडे आणि सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा बाबाराव देशमाने यांना हा सन्मान देण्यात आला.
मंदिरात झालेल्या कार्यक्रमाला महापौर मंजुषा नागपुरे, ट्रस्टच्या विश्वस्त व उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, अॅड. प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले आदी उपस्थित होते. महावस्त्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.
मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, अनेक महिला समाजासाठी विविध प्रकारचे काम करतात. त्यांचे कार्य समाजासमोर आणून त्यांचा सन्मान केल्याने इतर महिलांनाही प्रेरणा मिळते. संघटन आणि शक्तीच्या माध्यमातून राष्ट्रहितासाठी काम करण्याची गरज आहे.
सुमेधा चिथडे यांनी राष्ट्रभक्ती, सेवा आणि प्रेमभावनेतून देशासाठी काम करण्याचे आवाहन केले. उत्सव साजरे करताना देशाच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या सैनिकांचीही आठवण ठेवावी, असे त्यांनी सांगितले. आपण किती कमावतो यापेक्षा सैनिकांसाठी किती योगदान देतो, हे महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या.
सुमेधा चिथडे ‘सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाऊंडेशन’च्या संस्थापक असून ‘ऑक्सिजन वुमन’ म्हणून ओळखल्या जातात. डायना पंडोल यांनी भारतीय मोटार स्पोर्ट्समध्ये अनेक विक्रम केले आहेत. परभणीच्या सत्यभामा देशमाने यांनी ‘स्नेहवन’ संस्थेच्या माध्यमातून १०० मुलांचा सांभाळ केला आहे. या तिन्ही महिलांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज लाहोटी यांनी केले.





