रांची – झारखंडमध्ये मंगळवारी २ मालगाड्यांमध्ये समोरासमोर धडक झाली. त्या अपघातात मालगाड्यांचे २ चालक मृत्युमुखी पडले. तर, इतर चौघे जखमी झाले. अपघातग्रस्त मालगाड्या एनटीपीसी या वीज कंपनीकडून ऑपरेट केल्या जातात. प्रामुख्याने कोळसा वाहतुकीसाठी त्या मालगाड्यांचा वापर केला जातो. अपघात घडला तो रेल्वेमार्गही एनटीपीसीच्या मालकीचा आहे. पहाट होण्याआधी मालगाड्यांमध्ये धडक झाली. एक मालगाडी उभी असताना दुसरी वेगाने समोरून आल्याने अपघात घडल्याचे सांगण्यात आले. अंधारामुळे कमी दृश्यमानता असल्याने धडक झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. अर्थात, एकाच वेळी मालगाड्या एकाच मार्गावर आल्याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. मालगाड्या आणि रेल्वेमार्ग एनटीपीसीच्या अखत्यारीत असल्याने अपघाताचा संबंध रेल्वे विभागाशी नसल्याचे स्पष्ट झाले.