अकोला – देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्स्प्रेस म्हणून गेल्याच आठवड्यात सुरू झालेल्या नागपूर ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, मालगाडीचे डब्बे निसटल्याने वंदे भारत एक्सप्रेसमधील प्रवाशांची तारांबळ उडाली असून तब्बल 2 तास उशिराने ही एक्स्प्रेस धावत आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर ही एक्स्प्रेस आज (रविवार) तब्बल 2 तास उभा राहिली होती. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे महामार्गावर मालगाडीचे कपलिंग अचानक तुटले आणि रेल्वेचे दोन भाग झाले. त्यामुळे, गार्डसह काही डबे मागे राहिले तर इंजिनसह बाकीचे डबे काही अंतरावर पुढे निघून गेल्याची घटना घडल्याने रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशांना देखील आश्चर्य केले. वंदे भारतच्या या प्रकारामुळे पुण्यासह मुंबईकडं जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. नागपूरहून अकोलाकडे जाणाऱ्या धावत्या मालवाहू रेल्वे गाडीचे डब्बे निसटले. मालगाडीचे कपलिंग अचानक तुटल्याने ही घटना घडली होती. मात्र, वेळीच हा प्रसंग लक्षात आल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.