Good News : विकासदर आगेकूच करणार; म्यॅन्युफॅक्चरींग, सेवाक्षेत्रही विस्तारणार

नवी दिल्ली – विविध राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येत आहेत. त्यामुळे भारताचा विकासदर यावर्षी वाढेल. आगामी काळातही भारताचा विकास दर वाढण्याच्या शक्यता बळावल्या आहेत असे मूडीज् इन्व्हेस्टर सर्विसेस या संस्थेने म्हटले आहे. मूडीज्ने केलेल्या या भाकीतानंतर भारतीय शेअर बाजारात खरेदीचा जोर वाढल्याचे दिसून आले.
ऑगस्ट महिन्याचा संदर्भ घेऊन मुडीज्ने जारी केलेल्या आर्थिक विश्लेषण अहवालामध्ये म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकास दर किमान 9.6 टक्के राहील तर 2022 मध्ये हा विकास दर सात टक्के राहण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने लॉकडाउनच्या काळामध्ये विचारपूर्वक आर्थिक सुधारणा करणारे पॅकेज जाहीर केले आहे. त्याचबरोबर ज्या वर्गाला मदतीची गरज आहे त्याच वर्गाला मदत मिळेल याची खात्री करण्यात आली आहे. दरम्यान रिझर्व्ह बॅंकेने गेल्या वर्षापासून उदार पतधोरण जाहीर केले आहे.
या कारणामुळे लॉकडाऊन कमी झाल्यानंतर अर्थव्यवस्था वेगाने पुनरुज्जीवित होण्यास मदत होत आहे. रिझर्व्ह बॅंक आगामी काळातही जोपर्यंत खात्रीने अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत शिथील पतधोरण जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्याजदर कमी पातळीवर राहतील आणि भांडवल सुलभता उपलब्ध राहील. याचा अर्थव्यवस्था विस्तारण्यास आणखी उपयोग होणार असल्याचे या संस्थेला वाटते.
भारताबरोबर अमेरिकेसह इतर विकसित देशाच्या रिझर्व्ह बॅंकाही दरम्यानच्या काळामध्ये व्याजदरात वाढ करणार नाहीत असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या विक्रमी पातळीवर गेले आहेत. गेल्या वर्षी लॉक डाऊनमुळे विकास दर उणे 7.3 टक्के झाला होत. जून महिन्यात मूडीज्ने या वर्षाचा विकास दर 9.3 टक्के राहील असे म्हटले होत. मात्र आता त्यात बदल करून हा विकास दर 9.6 टक्के राहील असे म्हटले आहे.त्यामुळे शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढत आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील वाहतूक वाढत असल्यामुळे जीएसटीचे संकलन वाढत आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात जीएसटीचे संकलन अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारतातील लसीकरण योग्य वेगाने होत आहे. मात्र नवे करोनाचे नवे प्रकार उदयास येत आहेत. त्यामुळे आगामी काळात सरकारने सावध राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे





