शरद पवारांसाठी गुड न्यूज! निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय; ‘तो’ संभ्रम कायमचा मिटवला

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) असे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या राज्याच्या राजकारणात आहेत. अजित पवार यांच्याकडे पक्षाचे ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह आहे. दोन्ही राष्ट्रवादीने घड्याळ चिन्हावर दावा केला असून, पक्ष आणि घड्याळ चिन्ह प्रकरण न्यायालयात सुरू आहे. आता शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकसभेची एक आणि विधानसभा निवडणुकीत १९ जागा गमावलल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला गुड न्यूज मिळाली आहे. शरद पवार गटाला ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यावरच शरद पवार गटाने निवडणुका लढल्या आहेत. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ‘पिपाणी’ या चिन्हामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फटका बसल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला होता.
आता केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार पिपाणी (ट्रम्पेट) चिन्ह वगळण्यात आले आहे. हा निर्णय ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर घेण्यात आल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. ‘पिपाणी’ या चिन्हाचे नाव ‘तुतारी’ या पक्षाच्या अधिकृत चिन्हाशी साधर्म्य असल्याने सामान्य मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत होता. याबाबत पक्षाकडून वेळोवेळी आयोगाला तक्रार करण्यात आली होती.
याचा फटका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये बसला असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले होते. या प्रकरणी शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल आयोगाने घेतली असून, मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १९४ मुक्त चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’चे नाव कायमचे काढून टाकण्यात आले आहे.
शरद पवार गटाच्या आकडेवारीनुसार, जितूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव, पारनेर, केज आणि परांडा या विधानसभा मतदारसंघांत पिपाणी चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवारांना पक्षाच्या उमेदवारांपेक्षा जास्त मते मिळाली होती. या मतांची विभागणी झाली नसती तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे किमान १९ आमदार निवडून आले असते, असा दावा पक्षाने केला होता. याबाबत वेळोवेळी तक्रारी निवडणूक आयोगाला करण्यात आली होती. पण त्यावेळी पिपाणी चिन्हाबाबत दखल घेण्यात आली नव्हती.





