जळगाव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय पक्षांत रणनीती आखण्याचा धंदा सुरू आहे. अशा वातावरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) जळगावमधून मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांचे ४० वर्षांचे निष्ठावंत सहकारी आणि ज्येष्ठ नेते अरुण गुजराती हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करणार आहेत. यासह चोपडा तालुक्यातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्तेही सोबत येणार असल्याने जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. मुंबईत प्रवेश सोहळा अरुण गुजराती यांचा पक्षप्रवेश मुंबईतील महिला विकास महामंडळाच्या कार्यालयात होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. यासाठी चोपडा तालुक्यातील कार्यकर्ते चार लक्झरी बसने मुंबईकडे रवाने झाले आहेत. सकाळीच गुजराती यांनी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवारांची भेट घेतली, ज्यात त्यांनी आपला निर्णय कळवला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याने शरद पवार गटात खळबळ उडाली आहे. गुजरातींचा राजकीय प्रवास अरुण गुजराती हे काँग्रेसच्या काळापासून शरद पवारांसोबत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष आणि माजी मंत्री अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. ते चोपडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहिले असून, जळगाव जिल्ह्यातील कुणबी समाज आणि शेतकरी नेत्यांमध्ये त्यांचा प्रभाव मोठा आहे. राष्ट्रवादीच्या चांगल्या-वाईट काळात त्यांनी शरद पवारांना साथ दिली होती. मात्र, आता स्थानिक निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाकडे वळण्याचा निर्णय घेतल्याने शरद पवार गटाची जळगावमधील ताकद कमी होण्याची चिन्हे आहेत. उलट, अजित पवार गटाची संघटनात्मक बांधिलकी मजबूत होईल. काय म्हणाले अरुण गुजराती ? शरद पवारांसोबत ४० वर्षे एकनिष्ठपणे काम केल्यानंतर सोडण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते, असे गुजराती म्हणाले. ते बोलले की, शरद पवारांनी मला मोठे केले आणि कार्यकर्त्यांनी पुढे आणले, या दोघांमध्ये मी फसल्यासारखे वाटते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांची अजित पवारांसोबत जाण्याची इच्छा होती, त्यामुळे मी हा निर्णय घेतला. मनावर दगड ठेवून पुढे जाणार आहे, पण शरद पवारांसोबतचा आनंदाचा काळ कधीच विसरता येणार नाही. हा पक्षप्रवेश शरद पवार गटासाठी केवळ वैयक्तिक धक्का नसून, जळगाव सारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील संघटनात्मक नुकसान ठरेल. अजित पवार गटाने स्थानिक निवडणुकीत प्रबळ भूमिका घेण्यासाठी अशा रणनीतिक हालचालींना गती दिली आहे. पुढील काळात जळगावमधील इतर नेत्यांच्या हालचालींनाही वेग येण्याची शक्यता आहे.