Gokul Gite : गोकुळ गीतेंची अखेर माघार ! बंड शमवण्यात महाजन-उदय सामंतांना यश
महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोरील सर्वात मोठे संकट अखेर टळले आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी अखेर आपली निवडणुकीतून माघार घेतली आहे.

Gokul Gite : महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोरील सर्वात मोठे संकट अखेर टळले आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी अखेर आपली निवडणुकीतून माघार घेतली आहे.
मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर गीते बंधूंच्या (Gokul Gite) निवासस्थानी झालेल्या चहापानानंतर हा समेट घडवून आणण्यात यश आले. या निर्णयानंतर आता नाशिकमध्ये महायुतीचे केवळ नरेंद्र दराडे हेच एकमेव अधिकृत उमेदवार रिंगणात असणार आहेत.
काल मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आज दोन्ही मंत्री थेट नाशिकमधील गिते बंधूंच्या निवासस्थानी दाखल झाले. बंद दाराआड झालेल्या बैठकीत गोकुळ गिते यांनी अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. सर्व मतदार माझ्या बाजूने आहेत, मग वातावरण माझ्यामुळे बिघडले आहे का? असा सवाल करत त्यांनी गिते कुटुंबाबाबत आक्षेपार्ह विधाने करणाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
गोकुळ गिते यांची नाराजी लक्षात घेता दोन्ही मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली. त्यानंतर गोकुळ गिते यांनी आपला निवडणूक प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला.
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत गोकुळ गिते आणि नरेंद्र दराडे दोघेही एकमेकांच्या शेजारी बसले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री महाजन म्हणाले, याला राजकीय ड्रामा म्हणता येणार नाही तर ओढाताण सुरू होती.
नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाला दिली. गणेश गीते यांनी ती जागा मागितली होती. नरेंद्र दराडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर जागा शिवसेनेला सुटली. आता सर्व चर्चा मिटल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चर्चा झाली आहे. आम्ही गीतेंना कोणतीही कमिटमेंट केली नाही. त्यांनीही तशी मागितली नाही. त्यांचा भविष्यात विचार केला जाईल. चांगली चर्चा झाली, त्यामुळे गोकुळ गीते (Gokul Gite) यांची माघार झाली, असे त्यांनी म्हटले.






