Vidhan Parishad Election : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीचं सर्व चित्र झालं स्पष्ट; तब्बल ‘इतके’ उमेदवार बिनविरोध
Vidhan Parishad Election : राज्यातील १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. महायुती आणि महाविकास आघाडीने अनेक ठिकाणी बंडखोरी रोखण्यात यश मिळवले,

Vidhan Parishad Election : राज्यातील १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. महायुती आणि महाविकास आघाडीने अनेक ठिकाणी बंडखोरी रोखण्यात यश मिळवले, तर काही मतदारसंघांत शेवटच्या क्षणापर्यंत नाट्यमय घडामोडी सुरू राहिल्या. परिणामी, १७ पैकी पाच जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले असून उर्वरित १२ मतदारसंघांत थेट लढती रंगणार आहेत.
अनिकेत तटकरे बिनविरोध विजयी – (Vidhan Parishad Election)
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे बिनविरोध विजयी झाले. ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अखेर अर्ज मागे घेतला. त्यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप करत ठाकरे गटाने त्यांची पक्षातून हकालपट्टी जाहीर केली.
विक्रम काकडे यांचा बिनविरोध विजय – (Vidhan Parishad Election)
पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी अर्ज मागे घेतल्याने काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध विजयी –
ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले. तर यवतमाळमध्ये काँग्रेस समर्थित उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड झाली.
भाजपचे अरुण लखाणी बिनविरोध –
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात भाजपचे अरुण लखाणी बिनविरोध निवडून आले. विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने त्यांचा विजय निश्चित झाला.
नाशिक मतदारसंघात सर्वाधिक नाट्यमय घडामोडी – (Vidhan Parishad Election)
Vidhan Parishad Election : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीचं सर्व चित्र झालं स्पष्ट; तब्बल ‘इतके’ उमेदवार बिनविरोध
नाशिक मतदारसंघात अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वाधिक नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपचे गणेश गीते यांनी अर्ज मागे घेतला; मात्र गोकुळ गीते यांनी उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे शिवसेनेचे नरेंद्र दराडे आणि अपक्ष गोकुळ गीते यांच्यात थेट सामना होणार आहे.
सांगली-सातारा मतदारसंघात शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांनी माघार घेतल्याने भाजपचे धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अभयसिंह जगताप यांच्यात प्रमुख लढत रंगणार आहे.
नागपूर पोटनिवडणुकीत भाजपचे डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे आमनेसामने असतील. तर नांदेडमध्ये भाजपचे अमर राजूरकर आणि काँग्रेसचे रामदास पाटील यांच्यात थेट मुकाबला होणार आहे.
जळगावमध्ये भाजपचे नंदकिशोर महाजन, ठाकरे गटाचे शरद तायडे आणि शिंदे गटाच्या बंडखोर रेश्मा काळे यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. अमरावतीत भाजपचे प्रवीण पोटे, काँग्रेसचे हर्षदीप देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा हे रिंगणात आहेत.
परभणी-हिंगोलीमध्ये शिवसेनेचे सईद खान, ठाकरे गटाचे डॉ. विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. धाराशिव-लातूर-बीडमध्ये भाजपचे बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख आमनेसामने आहेत.
छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात भाजपचे सुहास शिरसाट आणि ठाकरे गटाचे गणेश लोखंडे यांच्यात लढत रंगणार असून सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे वसंतराव देशमुख यांच्यात सामना होणार आहे.
दरम्यान, अर्ज माघारीनंतर राज्यातील बहुतांश मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट राजकीय संघर्षाची स्थिती निर्माण झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाची खरी परीक्षा आता मतदानात लागणार आहे.
बिनविरोध विजयी उमेदवार –
अरुण लखाणी (भाजप) – वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – पुणे
रवींद्र फाटक (शिवसेना) – ठाणे
अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) – रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना) – यवतमाळ
प्रमुख लढती –
सोलापूर : राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार)
नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना) विरुद्ध गोकुळ गीते (अपक्ष)
नांदेड : अमर राजूरकर (भाजप) विरुद्ध रामदास पाटील (काँग्रेस)
नागपूर : डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस)
धाराशिव-लातूर-बीड : बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)





