Gokul Election Rajesh patil : गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा ‘राईट हँड’; राजेश पाटील कोण आहेत?
राजेश पाटील यांच्या विजयाची चर्चा सुरू होताच अजित पवार यांच्या एका जुन्या भाषणाची आठवण पुन्हा चर्चेत आली आहे. मे 2025 मध्ये चंदगड परिसरातील नागरी सत्कार कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी राजेश पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाची खंत व्यक्त केली होती.

Gokul Election Rajesh patil : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रतिष्ठेची बनलेली गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक अखेर महायुतीने जिंकली आहे. महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांनी सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत चुयेकर यांचा 16 विरुद्ध 13 मतांनी पराभव केला. या निकालाने सतेज पाटील यांना मोठा राजकीय धक्का बसला असून महायुतीच्या गोटात जल्लोष सुरू झाला आहे.
विशेष म्हणजे, एकेकाळी अजित पवार यांनी राजेश पाटील यांना ‘माझा उजवा हात’ असे संबोधत त्यांच्या पराभवाची जाहीर खंत व्यक्त केली होती. आता त्याच विश्वासू नेत्याने गोकुळच्या सत्तेवर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे या विजयाला केवळ सहकारी संस्थेच्या निवडणुकीपुरते मर्यादित न ठेवता कोल्हापूरच्या राजकारणातील महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.
कोण आहेत राजेश पाटील?
राजेश नरसिंगराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार असून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचे वडील नरसिंग गुरुनाथ पाटील हेसुद्धा आमदार होते. त्यामुळे राजेश पाटील यांना राजकारणाचा वारसा घरातूनच मिळाला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते चंदगडमधून आमदार म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि दिवंगत अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांनी त्यांचा पराभव केला.
हा पराभव अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. आता विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजेश पाटील यांनी गोकुळच्या अध्यक्षपदावर मिळवलेला विजय त्यांच्या राजकीय पुनरागमनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
‘माझा उजवा हात पराभूत झाला’; अजितदादांची ती भावनिक आठवण पुन्हा चर्चेत!
राजेश पाटील यांच्या विजयाची चर्चा सुरू होताच अजित पवार यांच्या एका जुन्या भाषणाची आठवण पुन्हा चर्चेत आली आहे. मे 2025 मध्ये चंदगड परिसरातील नागरी सत्कार कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी राजेश पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाची खंत व्यक्त केली होती.
‘माझा उजवा हात राजेश पाटील पराभूत झाला आहे. त्यामुळे मी फेटा बांधला नाही. आमचा गड महाराष्ट्रात आला, पण आमचा सिंह गेला,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. पुढे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत राजेश पाटील यांना पुन्हा निवडून आणा, त्यानंतर तुम्ही सांगाल तेवढे फेटे बांधेन, असेही म्हटले होते. अजितदादांच्या या वक्तव्यामुळे राजेश पाटील भावुक झाले होते.
‘अजितदादा मुख्यमंत्री होईपर्यंत फेटा बांधणार नाही’; राजेश पाटलांची प्रतिज्ञाही चर्चेत!
राजेश पाटील यांच्याशी संबंधित आणखी एका प्रतिज्ञेची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत आपण फेटा बांधणार नाही, असा निर्धार त्यांनी केला होता. त्यामुळे अजितदादांशी असलेले त्यांचे राजकीय आणि भावनिक नाते किती घट्ट होते, हे अधोरेखित होते.
आज गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या या जुन्या विधानांची पुन्हा आठवण काढली जात आहे. अजितदादांच्या विश्वासातील नेत्याला मिळालेली ही मोठी राजकीय संधी असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
राजेश पाटील यांची पहिली प्रतिक्रिया….
राजेश पाटील यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली असून, त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “मी प्रथमतः सर्व दुध उत्पादक शेतकऱ्यांचे आभार मानतो. माझ्यावर दूध संघाची जबाबदारी सोपवली आहे. मी सर्वांसाठी हिताचं काम करेन. गोकुळचं वैभव वाढवण्यासाठी मी प्रयत्न करेन. गेल्या वर्षभरातला तोटा भरून काढण्यासाठी नियोजन करु.
कोर्टातून आदेश प्राप्त झाल्यानंतर निवड प्रक्रिया पूर्ण झाली. निवडणुकीच्यावेळी विरोधक होतो आता त्यांनीही सर्वानी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय करुयात. त्यासाठी हातात हात घेऊन काम करुयात, अशी अपेक्षा आहे. झालेलं विसरुन एकदिलान काम करुयात. पुढील पाच वर्ष बाकीचं सर्व राजकारण बाजूला ठेऊयात. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करु, ६२ वर्षांनंतर चंदगडसारख्या भागाला नेतृत्त्व मिळालं, अशी प्रतिक्रिया राजेश पाटील यांनी यावेळी दिली आहे.







