Nagar | ओव्हरफ्लोचे पाणी कोपरगावच्या पूर्व भागासाठी द्या – विवेक कोल्हे

कोपरगाव, (प्रतिनिधी) – पालखेड धरण ६५% भरले असून, जवळपास ७२३ क्युसेकने ओव्हरफ्लो चालू आहे. कोपरगाव मतदारसंघात पूर्व भागात पुरेसा पाऊस अद्याप झालेला नाही.
त्यामुळे बंधारे आणि पाझर तलाव भरले गेले नाही. त्यामुळे पालखेड अंतर्गत येणारे शिरसगाव, आपेगाव, गोधेगाव, घोयेगाव, उक्कडगाव, दहेगाव बोलका, सावळगाव, तिळवणी, लौकी, भोजडे, दुगलगाव या भागातील शेतकरी पाण्यासाठी त्रासले आहे.
ओव्हरफ्लो पाण्यातून बंधारे आणि तलाव भरले गेले तर आगामी काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे तलाव भरून मिळावे, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक, युवानेते विवेक कोल्हे यांनी केली आहे.
माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी दूरदृष्टी ठेवत बंधारे बांधून सदर भाग जलयुक्त करण्याचे काम केले होते. शेती, पशुधन आणि पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन होण्यासाठी मोठी मदत यामुळे होते.
हे बंधारे आणि पाझर तलाव माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि बिपीन कोल्हे यांच्या माध्यमातून मागील कालखंडात भरून मिळाले होते.
त्याचप्रमाणे आम्हाला या अतिरिक्त पाण्याचा लाभ मिळावा, ज्यातून दिलासा मिळावा, अशी भावना नागरिक आणि शेतकरी यांची आहे.
या मागणीवर तत्काळ सकारात्मक कार्यवाही व्हावी, अन्यथा शेतकरी बांधवांना भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी कोल्हे यांनी कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे.





