“अंबानी कुटुंबियांना जगभरात सर्वोच्च दर्जाची सुरक्षा द्या, याचा खर्च…”; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला महत्त्वपूर्ण आदेश

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत नुकतेच गौतम अदाणींना मागे टाकत मुकेश अंबानींनी प्रथम क्रमांकावर स्थान पटकावले आहे. त्यामुळे या देशातील महत्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या एका आदेशाला आव्हान देणाऱ्या अर्जावरील सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. त्यानुसार मुकेश अंबानी यांना फक्त महाराष्ट्र किंवा भारतातच नाही, तर जगभरात सर्वोच्च दर्जाची सुरक्षा दिली जावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी आणि त्यांची तीन मुलं आकाश, अनंत आणि इशा यांना आलेल्या धमकी प्रकरणातील मूळ कागदपत्र आणि पुरावे सादर करण्याचे निर्देश नुकतेच त्रिपुरा उच्च न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिले होते. या प्रकरणी केंद्राकडून विशेष सुट्टीकालीन याचिकाही करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने त्रिपुरा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण निकाली काढत याबाबत अंतिम आदेश दिले आहेत.
Supreme Court directs to provide highest level Z+ security cover to businessman Mukesh Ambani and his family members throughout India & abroad.
Entire cost of providing highest level Z+ security cover within territory of India or abroad shall be borne by them, court said. pic.twitter.com/qABwon3eIU
— ANI (@ANI) February 28, 2023
न्यायालयाने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना देशातील सर्वोच्च दर्जाची अर्थात Z+ सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, ही सुरक्षा फक्त मुंबईपुरतीच मर्यादीत न ठेवता भारतभर आणि जगात सगळीकडे पुरवण्यात यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रात ही सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, तर भारतभर आणि जगात जिथे जिथे ते जातील, त्या सर्व ठिकाणी ती सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाची असेल, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.
दरम्यान, फक्त मुंबईपुरती सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी कमी खर्चिक असली, तरी जगभरात सर्वोच्च दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा खर्च मोठा आहे. मात्र, हा खर्च अंबानी कुटुंबीय करतील, असं न्यायालयाने नमूद केलं आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा पूर्ण खर्च हा तेच करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.





