पुढचे तीन महीने मला द्या, मी राज्यात तुमचं सरकार देतो; फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिले आश्वासन

अमरावती : येत्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढचे तीन महीने मला द्या, मी राज्यात तुम्हाला तुमचं सरकार देतो असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
राज्यात आज पुन्हा नव्या दमानं मैदानात उतरण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आजचा दिवस तुम्ही लिहून घ्या, आपण जर एकजुटीने मैदानात उतरलो तर या विधानसभेत महायुतीचा भगवा रोवल्याशिवाय आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. कारण जनतेला पुन्हा एकदा हे लक्षात आला आहे की, खरे कोण आहे आणि खोटे कोण आहेत. जनता आपल्या पाठीशी आहे.
त्यामुळे या खोट्या लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी पुन्हा आपल्याला मैदानात उतरावे लागेल. गेली तीन महिने तुम्ही घरी होता, आता पुढची तीन महिने मला द्या, पुन्हा एकदा मी तुम्हाला राज्यात तुमची सत्ता देतो, असा विश्वास व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.





