Pune News : मनातील नकारात्मकतेचा विषारी विचार दूर करा आणि आनंदी जीवन जगा : डॉ. बी. के. शक्तीराज
Pune News : तसेच श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या महिला विभाग उपप्रमुख सौ.हंसा शाह यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या सरिता दीदी, सुजाता दीदी यांचा यथोचित सत्कार केला.

पुणे : तुमच्या मनातील विषारी विचार दूर करा आणि तुमचे आयुष्य साजरे करा.हाच धागा पकडत, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट अबू यांचे ख्यातनाम आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर, विश्वविक्रम धारक व माईंड ट्रेनर डॉ. बी. के. शक्तीराज यांच्या प्रमुख उपस्थितीत एका विशेष प्रेरणादायी सत्राचे आयोजन जयराज स्पोर्ट्स कन्व्हेन्शन सेंटर, कोंढवा येथे गुरुवार दि. २० ऑगस्ट रोजी, संध्याकाळी ६ ते ८ करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सुमधुर भजनाने झाली.त्यानंतर प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सरिता दीदी यांनी प्रास्ताविक आणि डॉ.बी. के.शक्तीराज यांचा परिचय करून दिला. श्री पूना गुजराती बंधू समाज व जयराज क्लबचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.राजेश शहा यांनी शाल आणि मोमेंटो देऊन डॉ.बी.के.शक्तिराज यांचा सत्कार केला. तसेच श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या महिला विभाग उपप्रमुख सौ.हंसा शाह यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या सरिता दीदी, सुजाता दीदी यांचा यथोचित सत्कार केला.
आपल्या व्याख्यानात मार्गदर्शन करताना डॉ.बी.के.शक्तिराज म्हणाले “आपल्या जीवनाची दिशा आपल्या विचारांवर ठरते. मनामध्ये साचलेले ताणतणाव, भीती, ईर्ष्या आणि ‘विषारी’ ठरलेले नकारात्मक विचार हे आपल्या आनंदाचे मारेकरी आहेत. जोपर्यंत आपण मनाचा हा कचरा साफ करत नाही, तोपर्यंत जीवनोत्सव साजरा करणे शक्य नाही,” असा मोलाचा संदेश दिला.त्यांनी माइंड मॅनेजमेंट आणि राजयोग मेडिटेशनच्या सोप्या व्यावहारिक युक्त्या उपस्थितांना प्रयोग करून दाखवल्या.
सत्राच्या शेवटी उपस्थितांनी आपल्या मनातील शंकांचे निरसन करून घेतले.या जीवन बदलवणाऱ्या सत्राचा लाभ घेण्यासाठी श्री पूना गुजराती बंधू समाजाचे ट्रस्टी हरीशभाई शहा,केतन कापडिया, दिलीपभाई मेहता तसेच दि पूना गुजराती केळवाणी मंडळाचे प्रमोद शहा, डॉ.मधुसूदन झवर, शहरातून विविध क्षेत्रांतील नागरिक, तरुण वर्ग आणि आध्यात्मिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यकर्माचे अयोजन जयराज ग्रुपने केले.





