Satara | माणच्या बीडीओंना साडी-चोळीची भेट

दहिवडी (प्रतिनिधी) – शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत संभ्रमावस्था निर्माण करून माण व खटाव तालुक्यातील महिलांना आ. जयकुमार गोरेंनी एकत्रित केले होते. या कार्यक्रमात शासकीय अधिकारी देखील सहभागी झाले होते.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अभयसिंह जगताप यांनी आक्रमक होत माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांना चांगलेच धारेवर धरले. सुट्टीच्या दिवशी लोकप्रतिनिधींची चाकरी केल्याबद्दल शेंडगे यांचा पुष्पहार व साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला.
जनतेच्या सेवेसाठी असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनी इथून पुढे लोकप्रतिनिधींच्या घरची भांडी धुणे बंद करावे. अन्यथा येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे हे लक्षात घ्यावे, नीट वागा अन्यथा गाठ माझ्याशी असा सज्जड इशाराही अभयसिंह जगताप यांनी दिला.
यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष युवक अध्यक्ष प्रशांत वीरकर, नगरसेवक महेश जाधव, माजी सरपंच किरण खळवे, माजी सरपंच विजय जगताप, दिलीप खरात, ऋषिकेश जगताप, विनोद अवघडे, सूनिकेत जगताप यांच्यासह अभयसिंह जगताप समर्थक व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.





