प्रभात वृत्तसेवा नाणे मावळ – तालुक्यातील नाणे मावळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांची बेकायदेशीर शिकार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे हे प्रकार वारंवार घडत असतानाही वनविभाग आणि संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नाणे मावळ हा परिसर डोंगररांगांनी, जंगलांनी आणि नैसर्गिक जलस्रोतांनी समृद्ध आहे. या ठिकाणी अनेक प्रकारचे स्थलांतरित तसेच स्थानिक पक्षी वास्तव्यास आहेत. मात्र अलीकडे काही समाजकंटकांकडून या निसर्गसंपत्तीवर घाला घालण्याचे प्रकार वाढले असून रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत पक्ष्यांची सर्रास शिकार केली जात आहे. स्थानिक नागरिक व प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत काही टोळक्यांकडून प्रचंड प्रकाशझोत टाकणारे टॉर्च, वाहनांचे हायबीम लाईट तसेच ध्वनी निर्माण करणारी उपकरणे वापरून पक्ष्यांना घाबरवले जाते. घाबरून उडणारे पक्षी पसरवलेल्या जाळ्यात अडकतात, तर काही पक्ष्यांना थेट मारले जाते. काही ठिकाणी बंदुकीसदृश साधनांचा वापर होत असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या बेकायदेशीर शिकारीत अनेक लहान पक्ष्यांसह काही दुर्मिळ व संरक्षित प्रजातींचाही समावेश असल्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. ही शिकार केवळ अन्नासाठी नसून काही वेळा छंद, विक्री किंवा अवैध व्यापारासाठी केली जात असल्याचा संशयही स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. वन्यजीव संरक्षण कायदानुसार पक्ष्यांची शिकार करणे हा गंभीर गुन्हा आहे. यामध्ये दंड व कारावासाची तरतूद असतानाही नाणे मावळ परिसरात हे प्रकार बिनधास्तपणे सुरू आहेत. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेकदा वनविभाग व प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्याचे सांगितले जात आहे. मात्र केवळ पाहणी, चौकशी किंवा आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या निष्क्रियतेमुळे शिकाऱ्यांचे मनोबल वाढले असून आता हे प्रकार अधिक खुलेआम आणि निर्भयपणे केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. जैवविविधतेला मोठा धोका पक्षी हे पर्यावरणीय साखळीतील महत्त्वाचे घटक आहेत. कीटक नियंत्रण, बीजप्रसार आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पक्ष्यांची संख्या घटल्यास शेती, जंगल आणि मानवी जीवनावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. परिसरात आधीच वणवे, जंगलतोड आणि मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गावर ताण वाढला आहे. त्यातच जर पक्ष्यांची बेकायदेशीर शिकार सुरू राहिली, तर येत्या काही वर्षांत या भागातील जैवविविधतेचा ऱ्हास अटळ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.