पिंपरी | घरकुल, सांगवी, रावेतसह नदीकाठचा वीजपुरवठा बंद

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरातील अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा वीजयंत्रेणेला फटका बसला आहे. वीजयंत्रणा व अनेक सोसायट्यांमधील मीटरबॉक्स पाण्यात असल्याने विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून 13 वीजवाहिन्यांसह 699 वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. तसेच अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे वीजयंत्रणा नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे विविध भागातील सुमारे 84 हजार 600 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.
वीजयंत्रणेत बिघाड झाला आहे त्याठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र गुरुवारी (दि. 25) दुपारी उशिरापर्यंत मुसळधार पावसाची संततधार सुरु असल्याने दुरुस्ती कामात मोठे अडथळे येत होते.
तसेच पाण्यात असलेली वीजयंत्रणा तसेच सुरक्षिततेसाठी वीजपुरवठा बंद ठेवलेल्या सोसायट्या किंवा परिसरातील वीजपुरवठा पाण्याचा निचरा झाल्यानंतर व पाहणी करून सुरु करण्यात येणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वीजयंत्रणेत पाणी शिरल्यामुळे निगडी येथील घरकूल व ओटा स्कीमचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. तसेच सेक्टर चारमधील मातोश्रीनगर, रावेत येथील नदीकाठचा परिसर, सांगवी, हिंजवडी, दापोड, खराळवाडी आदी भागातील सुमारे 55 वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.
आळंदी शहरात इंद्रायणी नदीचे पाणी शिरल्याने दोन रोहित्रांचा तसेच वडगाव शिंदे गावाचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. पाईट येथे दोन वीजखांब पडल्याने दोन गावांचा तसेच कामशेत, लोणावळा, कार्ला, वडगाव, तळेगाव परिसरातील 18 ते 19 गावांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. पाण्याचा धोका कमी झाल्यानंतर या गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.
अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे प्रामुख्याने मावळ व मुळशी तालुक्यातील वीजयंत्रणेला फटका बसला आहे. मुळशी तालुक्यात 30 ते 40 वीजखांब जमीनदोस्त झाले. त्यामुळे 105 रोहित्रांवरील 10 ते 12 गावांचा व सुमारे 2600 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.
यासोबतच मुळा नदीकाठच्या परिसरात भुकूम, भुगाव, माण व मारुंजी गावांतील 29 वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आला.मारुंजी गावांतील 29 वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आला.





