Pimpri : आई-वडिलांची किंमत ओळखा!

सांगवी : आई-वडिलांनी आयुष्यभर ज्या प्रेमाने आपला सांभाळ केला, त्या आईवडिलांना दोन दिवसांच्या प्रेमासाठी दूर लावणं दुर्दैवी आहे. अनाथ मुलांकडे एकदा बघा, त्यांना आईवडिलांचे महत्त्व काय वाटते हे उमगेल. “बाप असता तर माझेही लाड झाले असते,” ही भावना त्यांच्यामध्ये असते. व्यसन, वाईट संगत आणि मोबाइलच्या अतिवापरापासून दूर राहा आणि आईवडिलांचा सन्मान करा, असे भावनिक आवाहन व्याख्याते वसंत हंकारे यांनी केले.
बालाजी प्रतिष्ठान, जुनी सांगवी यांच्या वतीने दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात “न समजलेला बाप” या विषयावर हंकारे यांचे व्याख्यान झाले. या कार्यक्रमाला आमदार शंकर जगताप, माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, शारदा सोनवणे आदी उपस्थित होते.
हंकारे म्हणाले की, मोबाईलसारख्या कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्या मुलांचा बाप दु:खात उन्मळून पडतो. त्यामुळे पालकांचा सन्मान करा. व्याख्यानानंतर घरी गेल्यावर बापाला कडाडून मिठी मारा, असा हृदयस्पर्शी सल्ला हंकारे यांनी दिला. व्याख्यानाने उपस्थित सर्व श्रोते भावूक झाले.
क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल गायत्री दैवाळ, सीए परीक्षा उत्तीर्ण स्वरदा डुंबरे, स्नेहल देशमुख, आरोग्य विभागातील कर्मचारी दहावी परीक्षा उत्तीर्ण रेश्मा चव्हाण यांच्यासह सतीश लोहिया यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्षल ढोरे यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप तनपुरे यांनी केले.





