माळेगाव : बारामती तालुक्यातील सांगवी गावात शुक्रवारी (दि. २९) तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया शांततेत आणि सर्वानुमते पार पडली. नरसिंग तात्यासो जगताप यांची अध्यक्षपदी, तर अर्जुन कोंडीबा काळे आणि भानुदास भगवान जगताप यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मागील अध्यक्ष प्रमोद आबा तावरे यांनी आपला कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यांच्या कार्यकाळात गावात तंटामुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले, ज्यामुळे समितीची विश्वासार्हता आणि कार्यक्षमता वाढली. नवीन समितीच्या निवड प्रक्रियेदरम्यान गावातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये दूध संघाचे माजी चेअरमन प्रकाश तावरे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय तावरे, शेतकरी कामगार पक्षाचे तालुकाध्यक्ष अंकुश तावरे, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले. सर्वांनी एकमताने निवड प्रक्रियेला पाठिंबा दर्शवत गावात एकतेचा संदेश दिला. सांगवीत एकता आणि सहकार्याचा आदर्श – नव्या तंटामुक्ती समितीच्या नेतृत्वाकडून गावात शांतता, समजूतदारपणा आणि सामाजिक सलोखा वाढवण्याची अपेक्षा – ग्रामस्थांनी एकमताने केलेली निवड लोकशाही मूल्यांचे दर्शन घडवते – नवीन समिती गावातील वादविवाद सोडवण्यासह सामाजिक प्रश्न आणि विकासाच्या दिशेने पावले उचलण्यास सज्ज