प्रभात वृत्तसेवा पिंपळे गुरव – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा खरा वारसदार पक्ष आहे. हा पक्ष सर्वसामान्य, कष्टकरी आणि वंचितांच्या कष्टावर उभा राहिलेला आहे. आम्ही भाजपसोबत गेलो नाही, तर भाजप आमच्या सोबत आला आहे. आम्ही बाबासाहेबांची चळवळ सोडलेली नाही. समाजातील प्रत्येक सामान्य माणसाच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी रिपाई पक्ष नेहमी लढत राहील. आज महायुती मजबूत आहे आणि ती अशीच भक्कम राहील, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. जुनी सांगवी येथील डॉ. धम्मरत्न गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले बोलत होते. या कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. प्रसंगी डॉ. धम्मरत्न गायकवाड म्हणाले की, जण युवक कार्यालयाच्या माध्यमातून युवकांना रोजगार, उद्योजकता आणि सरकारी योजनांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत रिपाईचे विचार आणि काम पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. कार्यक्रमास आमदार शंकर जगताप, रिपाई महिला आघाडीच्या अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, अध्यक्ष कुणाल व्हावळकर, माजी महापौर उषा ढोरे, परशुराम वाडेकर, सूर्यकांत वाघमारे, बाळासाहेब भागवत, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, मस्के आदी मान्यवर उपस्थित होते.