Gen Z Protest Pune: पुणे विद्यापीठात ‘जेन झी’चा जल्लोष! रोहित पवारांसह विविध संघटनांच्या नेत्यांची उपस्थिती
Gen Z Protest Pune: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत जल्लोष; दिल्लीत गेलेल्या आंदोलक प्रतिनिधींचा विशेष सत्कार.

Gen Z Protest Pune – भर पावसात हातात तिरंगा घेत आणि युवा शक्तीचा विजय असो, अशा घोषणा देत रविवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर दुमदुमून गेला. नीट पेपरफुटीप्रकरणी अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर, युवा वर्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर एकत्र येत ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा केला.
गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या जंतरमंतरवर सीजेपीचे अभिजित दीपके आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होते. कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठिंब्याशिवाय केवळ विद्यार्थी ताकदीच्या जोरावर मिळालेला हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या जल्लोष सभेत सुरुवातीला परीक्षांमधील गोंधळामुळे आत्महत्या केलेल्या २१ दुर्दैवी विद्यार्थ्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यानंतर दिल्लीतील मुख्य आंदोलनात थेट सहभाग घेतलेल्या निहारिका भोसले, अभिषेक शेलकर, श्रावणी बुआ, राहुल नागटिळक आणि अक्षय कांबळे या विद्यार्थी प्रतिनिधींनी आपले संघर्षमय अनुभव मांडले. या वेळी आंदोलनात आघाडीवर असलेल्या प्रमुख विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विविध विद्यार्थी, राजकीय व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी आमदार रोहित पवार यांच्यासह राहुल डंबाळे, योगेश इंगळे, डॉ. राहुल ससाणे, नितीन आंधळे, राहुल नागटिळक, सुवर्णा डंबाळे आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे संपूर्ण आंदोलन काळात पुणे पोलिसांनी दाखवलेल्या संयमी आणि सहकार्याच्या भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी पुणे पोलीस लव्ह्ज यूच्या घोषणांनी परिसर ढवळून काढला. दिल्ली पोलिसांच्या तुलनेत महाराष्ट्र पोलिसांनी आंदोलकांना अत्यंत योग्य वागणूक दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
अशीच एकजूट दाखवा…
नीट परीक्षेतील अन्यायाविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेला हा लढा ऐतिहासिक आहे. या एकजुटीने सत्ताधाऱ्यांचा आणि अंधभक्तांचा अहंकार मोडून काढला, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. हा लढा राजकीय पक्षांचा नसून, सामान्य घरातील मुलांचा होता. आगामी काळातही संविधानाच्या रक्षणासाठी आणि अन्यायाविरुद्ध अशीच एकजूट दाखवा, असे आवाहन पवार यांनी केले.






