Rohit Pawar : भाजप परिवार त्यांच्या पाठीशी; प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया, रोहित पवार संतापले
Rohit Pawar : या प्रतिक्रियेवर शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत पलटवार केला आहे.

Rohit Pawar hits back at Devendra Fadnavis : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॅाक्रोच जनता पार्टीसमोर केंद्र सरकारला झुकावे लागल्याची चर्चा देशभरात सुरू आहे. महिन्याभरापासून या पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आंदोलन सुरु होते. या आंदोलनाच्या माध्यमातून थेट केंद्र सरकारला आव्हान देत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मुख्य मागणी करण्यात आली.
ही मागणी सरकारने मान्य केल्याने कॅाक्रोच जनता पार्टीने विजयी जल्लोष केला. यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या (धर्मेंद्र प्रधान) पाठीशी असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. या प्रतिक्रियेवर शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत पलटवार केला आहे.
आमदार रोहित पवारांचा पलटवार
मा. देवेंद्र फडणवीस साहेब, शिक्षणव्यवस्थेची वाट लावणाऱ्या धर्मेंद्र प्रधानांचं कौतुक आपण करत असाल, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असल्याचं आपण सांगत असाल तर याला काय म्हणावं? राजीनामा त्यांच्या चुकीमुळे दिलेला नाही तर त्यांनी उपकार केला आहे, हे आपल्याला सुचवायचंय का? गेले महिनाभर महिलांसह हजारो युवकांना लाठ्या काठ्या खाल्ल्या, २०-२५ दिवसांचं उपोषण करावं लागलं, काहींनी pellet gun चा सामना केला तर कुणी छर्रेच्या गोळ्या खाल्ल्या… आजही अनेक जण दवाखान्यात उपचार घेत आहेत, या सगळ्याबाबत आपल्याला कधी सहानुभूती वाटली नाही, पण आज धर्मेंद्र प्रधान यांच्याबद्दल सहानुभूती वाटत आहे. किती अंधभक्ती करणार? अशा शब्दांत रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेवर पलटवार केला.
मा. देवेंद्र फडणवीस साहेब,
शिक्षणव्यवस्थेची वाट लावणाऱ्या धर्मेंद्र प्रधानांचं कौतुक आपण करत असाल, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असल्याचं आपण सांगत असाल तर याला काय म्हणावं? राजीनामा त्यांच्या चुकीमुळे दिलेला नाही तर त्यांनी उपकार केला आहे, हे आपल्याला सुचवायचंय का?गेले… https://t.co/WOLj4m3MKp
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 26, 2026
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
श्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशाच्या शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणण्यात मोलाचा वाटा उचलला. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी पीएम श्री शाळांची स्थापना, परदेशात आयआयटींचा विस्तार आणि प्रवेश परीक्षांचा १९ भाषांपर्यंत विस्तार यांसारख्या अनेक सुधारणा राबवल्या. व्यापक समाजकल्याणाप्रति आपली वचनबद्धता दर्शवत, त्यांनी आज आपला राजीनामा सादर केला. त्यांनी वैयक्तिक स्वार्थापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिले, हेच एका खऱ्या भाजप कार्यकर्त्याचे लक्षण आहे. संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी उभा आहे.
…म्हणून राजीनामा घेणे भाग पडले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर किंवा आरोपांनंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. खरंतर दिल्लीतील या आंदोलनाचे पडसाद देशभरातील इतर राज्यात उमटायला सुरूवात झाली होती. महाराष्ट्र, बिहार, गुवाहाटी अशा सर्वच राज्यांमधील तरुणांमध्ये संतापाची लाट पसरली होती. आंदोलनाची व्याप्ती दिवसेंदिवस आणखी वाढून केंद्र सरकाविरोधात असंतोष वाढत चालला होता. त्यामुळे केंद्र सरकारला अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणे भाग पडले.
Free Healthcare : आषाढी वारीत ७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा






