Guillain Barré Syndrome : पुणेकरांनो सावधान ! GBS चा पहिला बळी, धायरीतील तरुणाचा सोलापुरमध्ये मृत्यू

सोलापूर : जीबीएसबाधित एका तरुणाचा सोलापूरमध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच या तरुणाला GBS याची लागण झाली होती. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होते मात्र त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुण्यातील DSK विश्वमध्ये राहणाऱ्या तरुणाचा GBS ची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असणारा तरुण पुण्यातील धायरी परिसरात असणाऱ्या डीएसके विश्व या ठिकाणी वास्तव्यास होता. काही दिवसांपूर्वीच या तरुणाला पुण्यात GBS या आजाराची लागण झाली होती. GBS मुळे तब्येत खालावल्याने त्याला सोलापूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं. हा तरूण बरा होऊन काहीच दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागातून बाहेर आला होता. मात्र यानंतर त्याला श्वासनाचा त्रास झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पुण्यात GBS ची लागण झालेल्या आणि सोलापुरात मृत्यू झालेल्या रुग्णाचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला जाणार आहे. या संदर्भातील तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल त्यामुळे लोकांनी घाबरण्याचे काही कारण नाही असे आवाहन सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
प्रशासनाने घेतले ‘हे’ 3 निर्णय
1) पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत.
2) खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना ‘शहरी गरीब’ योजनेचा लाभ देऊन पुणे महापालिकेच्या वतीने २ लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय आर्थिक मदत केली जाणार आहे.
3) कमला नेहरु रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी ‘इम्युनोग्लोब्यूलिन’ हे इंजेक्शन महापालिका मोफत उपलब्ध करून देणार आहे.
काय आहे गीयन बारे सिंड्रोम आजार?
आपल्या शरीरावर एखाद्या रोगाने हल्ला केला, तर आपली रोगप्रतिकार शक्ती आपल्या शरीराचा त्यापासून बचाव करते. पण गीयन बारे सिंड्रोम या दुर्मिळ आजारात हीच रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच शरीरावर हल्ला करते. 1961 मध्ये युरोपातल्या Battle of the Somme मध्ये दोन सैनिकांना पक्षाघाताचा अटॅक आला होता.एका विशिष्ट कारणामुळे हा पक्षाघात झाल्याचा निष्कर्ष गीयन, बारे आणि स्ट्रोहल या तीन फ्रेंच लष्करी न्यूरोलॉजिस्टनी काढला होता. याच आजाराला आज गीयन बारे सिंड्रोम किंवा GBS म्हटले जाते.
गीयन बारे सिंड्रोम का होतो?
हा आजार अतिशय दुर्मिळ असा आजार आहे. साधारण 78 हजार जणांपैकी एकाला हा सिंड्रोम होतो. आणि तो का होतो, याची सगळी कारणं अजून पूर्णपणे समजलेली नाही. पण बहुतेक प्रकरणांमध्ये एखाद्या विषाणू किंवा बॅक्टेरिया इन्फेक्शननंतर हा आजार होतो.
काय काळजी घ्यावी ?
महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने GBS आजाराची लक्षणे आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी हे स्पष्ट केले आहे. पिण्याचं पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी, त्यासाठी पाणी उकळून प्यावं. तसेच, अन्न स्वच्छ आणि ताजे असावे, वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा आणि शिजलेलं आणि न शिजलेलं अन्न एकत्र न ठेवल्यास हा संसर्ग टाळता येईल.
या आजाराची काय आहेत लक्षणे?
अचानक पायातील किंवा हातातील येणारी कमजोरी किंवा लकवा, अचानकपणे चालताना होणारा त्रास आणि अशक्तपणा आणि डायरिया (जास्त दिवसांचा) ही तीन लक्षणे असल्याचे सध्या समोर आले आहे.





