पालघर : पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालूक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका पाड्यावरली गर्भवती महिलेला चक्क घनदाट जंगलात सोडून रुग्णावाहिका चालक निघून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली असून संबंधित रुग्णवाहिका चालकावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. सविता बांबरे (माहेरचे नाव बारात) या २४ वर्षीय प्रसूत महिलेला रविवार २४ नोव्हेंबरला जव्हार कुटीर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. सुखरूप झालेल्या प्रसूतीनंतर तिला १०८ रुग्णवाहिकेने घरी पाठवण्यात आले. पण रुग्णवाहिका चालकाने गावापासून पूर्ण दोन किलोमीटर आधी, जंगलातल्या निर्जन रस्त्यावर थांबवले आणि “पुढे रस्ता खराब आहे” असं सांगून सविता, तिचं नवजात बाळ, सासू आणि आई यांना खाली उतरवून निघून गेला. बाळाला कुशीत घेऊन, कमजोर अवस्थेतील सविता आणि तिच्या कुटुंबीयांना त्या घनदाट जंगलातून तब्बल २ किलोमीटर पायपीट करत घरी पोहोचावं लागलं. सध्या जव्हार-मोखाडा परिसरात बिबट्यांचा वावर आणि हल्ल्यांच्या घटना वाढलेल्या असतानाच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. “आमच्या जीवाचा विचारही त्याने केला नाही. रात्रीचे वेळी जंगलात बिबटे फिरतात, काही झालं असतं तर जबाबदार कोण?” असा संताप सविताच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. या घटनेने संपूर्ण मोखाडा तालुक्यात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील आरोग्य यंत्रणेची वाटचाल आणि १०८ रुग्णवाहिकेच्या सेवेची विश्वासार्हता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित रुग्णवाहिका चालकावर तात्काळ निलंबन आणि कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे