राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत गायत्री तांबवेकरची सुवर्ण कामगिरी!

Gayatri Tambavekar – चेन्नई येथे आयोजित 76वी सीनिअर, 53 वी ज्युनिअर आणि 39 वी सब-ज्युनिअर राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत पुण्याच्या गायत्री तांबवेकरने सुवर्ण कामगिरी करून महाराष्ट्राचा मान उंचावली आहे. या स्पर्धेत 14, 16, 18 आणि सीनिअर वयोगटांमध्ये देशभरातून 450 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
14 वर्षांखालील वयोगटातील पर्सूट प्रकारात गायत्रीने 3 मिनिटे 11.180 सेकंदाचा वेगवान वेळ नोंदवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तिच्या या अप्रतिम कामगिरीपुढे मणिपूरच्या साई खोम देवी (3 मिनिटे 11.200 सेकंद) आणि राजस्थानच्या प्रियांका दुडी (3 मिनिटे 11.450 सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
गायत्रीने आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने महाराष्ट्रासाठी मोलाचा विजय खेचून आणला आहे. तिच्या या यशामध्ये सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे सचिव संजय साठे यांचे मार्गदर्शन व पाठिंबा, तसेच फिनिक्स सायकलिंग अकॅडमीचे प्रशिक्षक दर्शन बारगुजे यांचे कठोर प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले आहे.
बाणेर येथील विबग्योर शाळेत इयत्ता आठवीत शिकणारी गायत्री गेल्या सात वर्षांपासून या अकॅडमीमध्ये सराव करत आहे. तिच्या या सुवर्ण कामगिरीवर क्रीडाप्रेमी समाधान व्यक्त करत असून सायकलिंगमध्ये ती आणखी उज्वल कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.





