नगर | गावरान कांद्याला ४४ रूपये उच्चांकी भाव; गावरान कांद्याला उच्चांकी भाव

नगर – गेल्या आठवड्यापासून कांद्याची आवक कमी झाली. बाहेरील राज्यातून मागणी वाढल्याने आता भावातही वाढ होत आहे. अहमदनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या गावरान कांद्याला जास्तीत जास्त ४४ रुपये किलो प्रमाणे भाव मिळाला आहे. या हंगामातील हा उच्चांकी भाव आहे.
कांदा या पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील दुष्काळी नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव तालुक्यात कांद्याचे उत्पादन जास्त घेतले जाते. जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस झाला आहे. जादा पावासामुळे शेतातील लाल कांदा सडू लागला आहे. गावरान कांदा हा वाहतुकीसाठी योग्य आणि टिकाऊ असल्याने परराज्यातील व्यापारी या गावरान कांद्याला प्राधान्य देत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सोमवार (ता.२) ३८ हजार ७४ गोणी कांद्याची आवक झाली होती. सोमवारी कांद्याचे बाजार वाढले असून, लिलावात कांदा १५०० रुपयांपासून ४४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री झाला. मागील कांदा लिलावाच्या तुलनेत मोठी वाढ झाली. बाजार समितीमध्ये २०.९४१ क्विंटल आवक झाली होती. आवक कमी व मागणी वाढल्यामुळे भाव वाढल्याचे दिसून आले.





